येरवडा कारागृहातल्या कैद्याची बहिणीला सांकेतिक भाषेत चिठ्ठी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2021 04:20 AM2021-09-02T04:20:13+5:302021-09-02T04:20:13+5:30
पुणे : सदनिकेच्या व्यवहारासाठी सात लाख रुपये दिले आणि त्याबदल्यात २५ लाख रुपये, फोन-पे आणि बँक खात्याद्वारे बळजबरीने ...
पुणे : सदनिकेच्या व्यवहारासाठी सात लाख रुपये दिले आणि त्याबदल्यात २५ लाख रुपये, फोन-पे आणि बँक खात्याद्वारे बळजबरीने काढून घेत जिवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी येरवड्याच्या कारागृहात रवानगी झालेल्या आरोपीने त्याच्या बहिणीला सांकेतिक भाषेत चिठ्ठी लिहिली. त्यात दोन मोबाईल आणि तीन वेगवेगळ्या कंपन्यांचे प्रत्येकी एक सीमकार्ड कारागृहात पोहोच कर, अशी सूचना केल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. त्यामुळे अटक केलेल्या बहिणीचा जामीन अर्ज प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी जान्हवी केळकर यांनी फेटाळला आहे.
उसने दिलेले पैसे मिळण्यासाठी संबंधित महिला आरोपी ही साक्षीदारांच्या घरी जाऊन राहत असल्याची माहिती पोलिसांनी न्यायालयास दिली. हा प्रकार २०१८ ते २२ जून दरम्यान कोथरूड परिसरात घडला. याबाबत ५३ वर्षीय व्यावसायिकाने फिर्याद दिली आहे. त्यावरून सागर रजपुतसह जिग्नेशा राजपूत, प्रभावती रजपूत, राणी मारणे, अमित काळे, भुड्या यांसह अन्य पाच ते सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात सागर कल्याण राजपूत (वय ३४, रा. शास्त्रीनगर, कोथरूड. मुळ रा. कल्प डिझायनर गोत्री, वडोदरा, गुजरात) आणि राणी सागर मारणे (वय २७, रा. कोथरूड) यांनी अटक करण्यात आली आहे.
सागर हा सध्या येरवडा कारागृहात आहे. राणी हिला अटक करून तिची देखील कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. राणी हिला अटक होण्यापूर्वी सागरने तिला सांकेतिक भाषेत चिठ्ठी पाठवली होती. या चिठ्ठ्या पोलिसांनी तपासादरम्यान जप्त केल्या आहेत. दरम्यान, राणी हिने जामिनासाठी अर्ज केला होता. तिच्या जामीन अर्जास ॲड. विशाल मुरळीकर यांनी विरोध केला. राणी व सागर याची पत्नी जिग्नेशा राजपूत यांनी मिळून फिर्यादी यांना धमकावून त्यांच्याकडून जुलैअखेरपर्यंत चार लाख ४५ हजार रुपये घेतले आहे. राणी ही कोणाच्या मदतीने सागर यास कारागृहात चिठ्ठी पाठवते याचा तपास करायचा आहे. त्यामुळे तिचा जामीन फेटाळावा असा युक्तिवाद ॲॅड. मुरळीकर यांनी केला. दोन्ही पक्षांचा युक्तिवाद ऐकून न्यायालयाने तिचा जामीन अर्ज फेटाळला.