Corona Virus: पुण्यात कोरोना रुग्णसंख्येत लक्षणीय घट; महिनाभरात संख्या ५८० वरून ३६
By ऑनलाइन लोकमत | Published: June 1, 2023 12:06 PM2023-06-01T12:06:24+5:302023-06-01T12:06:50+5:30
सध्या राज्यातही रुग्णसंख्या घटली असून केवळ २४२ रुग्ण सक्रिय आहेत
पुणे : पुण्यात काेराेनाच्या नवीन रुग्णांची संख्या सातत्याने घटत आहे. त्यामुळे महिनाभरापूर्वी राहत्या घरी ५४६ आणि हाॅस्पिटलमध्ये ३४ असे ५८० रुग्ण सक्रिय हाेते. आता महिनाभरातच ही संख्या ९५ टक्क्यांनी कमी झाली आहे. सध्या शहर व ग्रामीण मिळून केवळ ३६ रुग्ण सक्रिय असून, त्यापैकी ५ रुग्ण हाॅस्पिटलमध्ये तर ३१ रुग्ण हे घरी उपचार घेत आहेत.
पुणे जिल्ह्यात बुधवारी ३८५ रुग्णांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी पुणे शहरात ३ आणि पिंपरी चिंचवडमध्ये १ असे केवळ ४ रुग्ण पाॅझिटिव्ह आढळले. तर, आतापर्यंत पुण्यात १ काेटी १३ लाख ६९ हजार काेराेनाच्या तपासण्या झाल्या असून, त्यापैकी १५ लाख ११ हजार रुग्ण पाॅझिटिव्ह आढळून आले आहेत, तर १४ लाख ९१ हजार रुग्ण बरे हाेऊन घरी गेले असून, १९ हजार ७७० रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
राज्यात २४२ रुग्ण सक्रिय
सध्या राज्यातही रुग्णसंख्या घटली आहे. सध्या केवळ २४२ रुग्ण सक्रिय आहेत. त्यापैकी सर्वाधिक सक्रिय रुग्ण हे मुंबईमध्ये ७१, ठाण्यात ५९ आणि पुण्यात ३६ रुग्ण सक्रिय आहेत. उरलेल्या सर्व जिल्ह्यांत रुग्णसंख्या २० च्या आत आहे.