Pune: पुण्यात महिलांवरील अत्याचारांमध्ये लक्षणीय वाढ, ३७६ पेक्षा अधिक बलात्काराच्या घटनांची नोंद

By ऑनलाइन लोकमत | Published: December 16, 2023 12:51 PM2023-12-16T12:51:02+5:302023-12-16T12:52:07+5:30

महिलांवर सोशल मीडियाच्या माध्यमातूनदेखील विनयभंग केल्याच्या घटना देखील घडत आहेत...

Significant increase in incidents of violence against women in Pune during the year | Pune: पुण्यात महिलांवरील अत्याचारांमध्ये लक्षणीय वाढ, ३७६ पेक्षा अधिक बलात्काराच्या घटनांची नोंद

Pune: पुण्यात महिलांवरील अत्याचारांमध्ये लक्षणीय वाढ, ३७६ पेक्षा अधिक बलात्काराच्या घटनांची नोंद

पुणे : शहरात दिवसेंदिवस महिला अत्याचारांच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. प्रेमाच्या जाळ्यात ओढून तसेच लग्नाचे आमिष दाखवून महिला व तरुणींवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणीच्या तक्रारी वाढल्या आहेत. यात अल्पवयीन मुलींवरही अत्याचार होत असल्याचे प्रकार समोर येत आहेत. महिला अत्याचाराच्या घटनांमध्ये पुणे राज्यात चौथ्या स्थानी असून, शहरात गेल्या वर्षी २ हजार ७४ गुन्हे दाखल झाले आहेत. त्यामुळे महिलांवरील वाढते अत्याचार ही चिंतेचा विषय ठरत आहे. महिलांवर सोशल मीडियाच्या माध्यमातूनदेखील विनयभंग केल्याच्या घटना देखील घडत आहेत.

ओळखीच्या व्यक्तींकडूनदेखील अत्याचार..पुण्यासह पिंपरी-चिंचवड शहरामध्ये दररोज दाखल होणाऱ्या महिला अत्याचारांच्या गुन्ह्यांमध्ये ओळखीच्या अथव्या नात्यातील व्यक्तींकडूनदेखील अत्याचार केले जात असल्याचे समोर येत आहे. यासह अल्पवयीन मुलींना प्रेमाचे किंवा लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार केले जातात. पुणे शहरात याप्रकारच्या १ हजार १३९ गुन्ह्यांची नोंद विविध पोलिस ठाण्यांमध्ये आहे. सोशल मीडिया तसेच भर रस्त्यात पाठलाग करून विनयभंग केला जातो. एमआयडीसी व कामाच्या ठिकाणी असे प्रकार जास्त घडतात. थेट घरात घुसून महिलांचा विनयभंग केल्याप्रकरणीदेखील काही तक्रारी दाखल झाल्या आहेत.

पोलिसांच्या गस्तीमुळे चौक सुरक्षित..

पुण्यासह पिंपरी-चिंचवड शहरामध्ये मुख्य चौक व रस्त्यांवर व्हेईकल पेट्रोलिंग तसेच पायी गस्त घालण्यात येते. त्यामुळे मुख्य रस्त्यांसह चौकांमध्ये तसेच सार्वजनिक ठिकाणी पोलिसांचा वावर वाढला आहे. परिणामी महिलांची छेडछाड, सोनसाखळी यासह इतर ‘स्ट्रीट क्राइम’ नियंत्रणात आले आहेत.

गुन्ह्यांचे प्रमाण वाढले..

महिला अत्याचाराशी संबंधित गुन्हे तत्काळ दाखल करण्याबाबत न्यायालयाचे निर्देश आहेत. त्यानुसार शहरातील पोलिस ठाण्यांमध्ये महिला अत्याचाराशी संबंधित गुन्हे दाखल केले जातात. त्यामुळे गुन्हे दाखल होण्याचे प्रमाण वाढत आहे.

‘दामिनी’चा दरारा..

पुणे शहरात ४० दामिनी पथके तर पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयांतर्गत ३२ दामिनी पथके आहेत. प्रत्येक पोलिस ठाण्यांतर्गत दामिनी पथके नियुक्त आहे. शाळा, महाविद्यालय, बसथांबे, उद्याने, मंदिर, रेल्वेस्टेशन, मेट्रो स्टेशन परिसरात तसेच गर्दीच्या ठिकाणी या पथकांकडून गस्त घातली जाते. त्यामुळे रोडरोमिओ, छेडछाड करणाऱ्यांवर पोलिसांचा वाॅच आहे. छेडछाड करणाऱ्यांना पोलिसांकडून कारवाईचा दणका दिला जात आहे.

जानेवारी ते नोव्हेंबर २०२३ दरम्यान दाखल गुन्हे

विनयभंग - पुणे - ४९३ - पिंपरी-चिंचवड - ३९६

बलात्कार - पुणे - ३८२ - पिंपरी-चिंचवड - २२३

पळवून नेणे - पुणे - ७७४ - पिंपरी-चिंचवड - ५०२

शहरातील महिला अत्याचाराचे गंभीर प्रकार...

१) संगणक अभियंता नयना पुजारी या महिलेचे अपहरण करून बलात्कार व खून.

२) रेसकोर्स परिसरात रिक्षाचे भाडे देण्यासाठी पैसे नसलेल्या अल्पवयीन मुलीवर रिक्षाचालकाने बलात्कार केल्याची घटना.

३) वडाची वाडी येथे बसचालकाने अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याची घटना.

४) एमपीएससी उत्तीर्ण दर्शना पवार खून प्रकरण.

५) सदाशिव पेठेतील पेरुगेट पोलिस चौकीजवळ भरदिवसा एकतर्फी प्रेमातून तरुणीवर कोयत्याने वार.

६) परराज्यातून आलेल्या अल्पवयीन मुलीवर आरपीएफ कर्मचारी अनिल पवार याने बलात्कार करून खंडणी मागितल्याची घटना.

अन्य शहरांच्या तुलनेत पुणे शहर अत्यंत सुरक्षित आहे. रात्रीच्या वेळी रेल्वे स्टेशन अथवा स्वारगेट या परिसरात महिला एकटी दिसली तर ती घरी अथवा इच्छितस्थळी पोहोचेपर्यंत आमच्याकडून काळजी घेतली जाते. प्रामुख्याने रात्रीच्या वेळी पोलिस अधिक सतर्क असतात.

- स्मार्तना पाटील, पोलिस उपायुक्त, परिमंडळ - २

महिला अत्याचाराशी संबंधित गुन्हे तत्काळ दाखल करून घेण्यात येतात. तसेच अशा प्रकरणांच्या तपासाला प्राधान्य दिले जाते. महिला, तरुणींची छेडछाड करणाऱ्यांवर कारवाई केली जात आहे.

- बाळासाहेब कोपनर, सहायक पोलिस आयुक्त, पिंपरी-चिंचवड

 

Web Title: Significant increase in incidents of violence against women in Pune during the year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.