शर्यतबंदी उठविण्याची चिन्हे!
By admin | Published: June 15, 2014 04:05 AM2014-06-15T04:05:06+5:302014-06-15T04:05:06+5:30
बैलगाडा शर्यतींवर आलेली बंदी उठविण्यासाठी भारत सरकारच्या पर्यावरण व वन मंत्रालयाच्या राजपत्रातील जंगली प्राण्यांच्या यादीतून बैलाचा समावेश वगळावा
पुणे : बैलगाडा शर्यतींवर आलेली बंदी उठविण्यासाठी भारत सरकारच्या पर्यावरण व वन मंत्रालयाच्या राजपत्रातील जंगली प्राण्यांच्या यादीतून बैलाचा समावेश वगळावा, या प्रमुख मागणीसाठी खासदार शिवाजीराव आढळराव-पाटील यांच्या नेतृत्वाखाली बैलगाडामालकांनी केंद्रीय वन व पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांची भेट घेतली. या वेळी झालेल्या चर्चेत जावडेकर यांनी बैलगाडा शर्यत सुरू करण्यासाठी सर्व मदत करणार असल्याचे सांगून सकारात्मक प्रतिसाद दिला.
जावडेकर यांच्याशी चर्चा करताना खासदार आढळराव-पाटील यांनी निदर्शनास आणून दिले, की १९९१मध्ये राजपत्रात कुत्रा या पाळीव प्राण्याचा समावेश केला होता. त्याविरोधात इंडियन सर्कल संघटनेने दिल्ली उच्च न्यायालयात अपील केले. न्यायालयाने कुत्रा हा शब्द राजपत्रातून वगळावा, असा निर्णय दिला. बैल हादेखील पाळीव प्राणी असूनही जंगली प्राण्यांच्या यादीत समावेश करणे सर्वथा चुकीचे असल्याने बैल हा पाळीव प्राणी सदर राजपत्रातून वगळावा, अशी विनंती केली.
या वेळी माजी आमदार बाबूराव पाचार्णे, खेड पंचायत समितीचे माजी उपसभापती राजूशेठ जवळेकर, खासदार आढळराव-पाटील, बैलगाडा संघटनेचे अध्यक्ष जयसिंगशेठ एरंडे, पंचायत समिती सदस्या अॅड. अमृता गुरव, संदीप बोदगे, अण्णा भेगडे, भानुदास लांडगे, सागर शेलार, रामभाऊ सासवडे, मुकुंद बोऱ्हाडे, राजेंद्र टाकळकर, संतोष
भोसले, भाऊसाहेब सावंत, राजेंद्र दिंडोरे, संदेश आल्हाट, दत्ता
गिलबिले, संदीप मोरे, अमोल हरपळे, करण जाधव आदी उपस्थित
होते. (वार्ताहर)