भामा आसखेडच्या पाण्यावरून वाद पेटण्याची चिन्हे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2020 04:28 AM2020-12-15T04:28:07+5:302020-12-15T04:28:07+5:30

पुणे : गेले आठ-दहा वर्ष रखडलेला भामा आसखेड प्रकल्प मार्गी लागला आहे. या प्रकल्पामधून पुण्याच्या पूर्व भागाची पाण्याची निकड ...

Signs of a dispute over Bhama Askhed water | भामा आसखेडच्या पाण्यावरून वाद पेटण्याची चिन्हे

भामा आसखेडच्या पाण्यावरून वाद पेटण्याची चिन्हे

Next

पुणे : गेले आठ-दहा वर्ष रखडलेला भामा आसखेड प्रकल्प मार्गी लागला आहे. या प्रकल्पामधून पुण्याच्या पूर्व भागाची पाण्याची निकड भागणार आहे. मुळात हा प्रकल्पच येरवडा, वडगाव शेरी, नगर रस्ता, खराडी, चंदननगर आदी भागांतील नागरिकांसाठी राबविला आहे. परंतु, हा प्रकल्प पूर्ण होताच पाणी वाटपावरुन वाद उद्भवण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. कारण, हे पाणी पुण्यात पोचण्याआधीच आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी खडकीसाठी तर, नगरसेविका कालिंदा पुंडे यांनी हडपसरसाठी मागणी केली आहे.

भामा आसखेड योजना मागील दोन्ही सरकारच्या काळात रखडली होती. भूसंपादनासह शेतकऱ्यांच्या मोबदल्याचे अनेक प्रश्न, आंदोलने कौशल्याने हाताळत ही योजना पुर्णत्वास आली आहे. भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये यावरुन श्रेयवादाची लढाई सुरु झाली आहे. या प्रकल्पाचे उद्घाटन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्याचे नियोजन भाजपाने केले आहे. तर, राष्ट्रवादीने उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या हस्तेच उद्घाटन करण्याचा चंग बांधला आहे. यामुळे या योजनेच्या पाण्याला वादाची धग जाणवू लागली आहे.

हडपसर भागाला लष्कर जलकेंद्रामधून होणारा पाणीपुरवठा बंद झाल्यानंतर तो आता हडपसर वानवडी भागाला वळविण्याचा आग्रह सत्ताधारी भाजपने धरला आहे. वडगावशेरी भागाला सोडण्यात येणारे रोजचे दोनशे ‘एमएलडी’ पाणी हडपसरला हवे, अशी मागणी भाजपच्या नगरसेविक पुंडे यांनी केली आहे. हे नियोजन केल्यास पूर्व भागामध्ये पुरेसे पाणी मिळेल असे पुंडे यांनी स्पष्ट केले आहे. लष्कर जलकेंद्रातील पूर्व भागाच्या वाट्याचे पाणी अन्य परिसरांना दिल्यास आंदोलनाचा पवित्रा पुंडे यांनी घेतला आहे.

भामा आसखेड योजनेतून पूर्व भागाला पाणीपुरवठा होणार असून त्याच्या अंतिम चाचण्याही झाल्या आहेत. येत्या काही दिवसांमध्ये योजना प्रत्यक्ष कार्यान्वित होईल. त्यानंतर लष्कर जलकेंद्रातून या भागांना होणारा पाणीपुरवठा बंद होणार आहे.

====

सध्या पूर्व भागासाठी खडकवासला धरणामधून लष्कर जलकेंद्रात ४०० एमएलडी पाणी घेतले जाते. त्यातील दोनशे एमएलडी पाणी भामा आसखेडमधून उचलले जाणार असल्याने शिल्लक राहिलेले पाणी अन्य भागाला पुरविण्याचे नियोजन आहे.

Web Title: Signs of a dispute over Bhama Askhed water

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.