जागेचा वाद उफाळण्याची चिन्हे
By admin | Published: March 11, 2016 01:40 AM2016-03-11T01:40:31+5:302016-03-11T01:40:31+5:30
वाघोली ग्रामपंचायत व ग्रामस्थांना विश्वासात न घेता त्यांना डावलून महानगरपालिकेने बीआरटी नगर रस्ता थेट राज्य सरकारकडून जागा मिळवण्याचा प्रयत्न केला आहे
आव्हाळवाडी : वाघोली ग्रामपंचायत व ग्रामस्थांना विश्वासात न घेता त्यांना डावलून महानगरपालिकेने बीआरटी नगर रस्ता थेट राज्य सरकारकडून जागा मिळवण्याचा प्रयत्न केला आहे. आमदारांना विचारात न घेता ही एक प्रकारे मुस्कटदाबी आहे. त्यामुळे होणाऱ्या घटनेस महापालिका व राज्य शासन जबाबदार राहील, असा इशारा माजी जि. प. सदस्य व ग्रामपंचायत सदस्य रामदास दाभाडे यांनी दिला आहे.
नगर रस्ता बीआरटी सुरू करण्यासाठी वाघोली केसनंद फाटा येथील साधारण अडीच एकर जागा महापालिकेने ग्रापंचायतीकडे मागणी केली होती. त्याबदल्यात ग्रामपंचायतीने काही अटी घातल्या होत्या. पण त्या मागण्या पुणे महापालिकेने डावलून त्यांना विचारात न घेता मुंबई येथे झालेल्या बैठकीत निर्णय घेतला. पुणे महापालिकेने वाघोली ग्रामपंचायतीला डावलून राज्य शासनाकडून परवानगी घेतली आहे. त्यामुळे हा एक प्रकारे कुटील बेत असून, ग्रामस्थांचा विचार न घेतल्याने हा वाद उफाळला आहे. मनसे अध्यक्ष संदीप सातव यांनी विरोध करून आंदोलनाचा इशारा दिला आहे. बीआरटीवरून वाघोली गावामध्ये संतापाची लाट पसरली आहे. सरकारच्या मालकीची त्याच परिसरात दुसरी एक जागा आहे, ती महापालिकेला देण्याचे निर्णय घेतला असला, तरी पण कोणती जागा, त्याचा गट नंबर कोणता, अजून दुसरीकडे आहे का? यामुळे अनेकांना प्रश्न पडला आहे, की महापालिका सर्व जागा घेत आहे का? यामुळे ग्रामपंचायत सदस्य व कार्यकर्ते विचारात पडले आहेत.
हा वाघोली ग्रामपंचायतीचा अपमान
सरपंच संजीवनी वाघमारे यांनी सांगितले, की पालकमंत्र्यांशी बीआरटीविषयी एक ते दीड महिन्यापूर्वी, आम्ही ग्रामपंचायत सदस्य चर्चा करण्यासाठी गेलो असता, ते उपस्थित नव्हते. त्यांनी फोनवर सांगितले, की याविषयी बैठक बोलावून चर्चा करू. जागा शासनाची असली तरी वाघोली ग्रामपंचायतीचा हा अपमान आहे. आम्ही तातडीने ग्रामसभा बोलावून त्यामध्ये जो निर्णय होईल, तो करू.