पुरंदरमध्ये चाराटंचाईची चिन्हे, १० दिवसांत परिस्थिती गंभीर होण्याची जिल्हाधिकाऱ्यांना भीती
By ऑनलाइन लोकमत | Published: April 9, 2024 11:28 AM2024-04-09T11:28:10+5:302024-04-09T11:28:38+5:30
जेजुरी व बारामती नगर नगर परिषद कार्यक्षेत्रात बांधकामासाठी वापरण्यात येत असलेल्या पाण्याला बंदी घालण्यात आली असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले....
पुणे : जिल्ह्यात पिण्याच्या पाण्याची टंचाई सध्या दिसत नसली तरी जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न पुढील दहा दिवसांत निर्माण होऊ शकतो, अशी भीती जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी व्यक्त केली. पुरंदर तालुक्यातील चार गटांमधील काही गावांमध्ये चाऱ्याची परिस्थिती गंभीर असून त्या दृष्टीने काही संस्था व व्यक्तींना चारा उपलब्ध करून देण्याची विनंती करण्यात आली आहे. याबाबत नियोजन करण्यात येत असल्याची माहिती दिवसे यांनी दिली. जेजुरी व बारामती नगर नगर परिषद कार्यक्षेत्रात बांधकामासाठी वापरण्यात येत असलेल्या पाण्याला बंदी घालण्यात आली असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
ते पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले, ‘जिल्ह्यात सध्या ८ तालुक्यांत १०८ टँकर सुरू असून सर्वाधिक ५१ टँकर पुरंदर तालुक्यात सुरू आहेत. ग्रामीण भागातील पिण्याच्या तसेच सिंचनाच्या पाण्यासाठी खडकवासला धरणातून दोन आवर्तने दिली जाणार आहेत. सध्या चारा डेपोची मागणी झालेली नसली तरी पुढील दहा दिवसांमध्ये पुरंदर तालुक्यातील चार गटांमधील काही गावांमध्ये चाऱ्याची स्थिती गंभीर होऊ शकते. त्या दृष्टीने काही संस्था व व्यक्तीशी संपर्क साधण्यात आला असून त्यांच्याकडील हिरवा तसेच कोरडा चारा जनावरांसाठी कसा उपलब्ध होऊ शकेल यासाठीचे नियोजन करण्यात येत आहे.’
पुणे शहरासाठी १५ जुलैपर्यंतचा साठा राखीव ठेवण्यात आला असला तरी देखील पुणे महापालिकेला पाणी बचतीसंदर्भात आणखी काटेकोर नियोजन करण्यात करण्याचे सांगितले आहे. पुणे शहराने पाणी बचत केल्यास हे पाणी ग्रामीण भागाला वापरता येणे सहज शक्य आहे. त्यानुसार महापालिकेने पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी कार वॉशिंग सेंटर, तसेच बेकायदा पाणी वापरावर कडक कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. आपत्कालीन परिस्थितीत बांधकामांना देण्यात येणारे पाणी तोडण्याचा निर्णय घ्यावा अशा देखील सूचना देण्यात आल्याचे दिवसे म्हणाले. जिल्हा प्रशासन या पाणीटंचाईवर लक्ष ठेवून असून यासंदर्भात पाटबंधारे कृषी, महसूल, ग्रामविकास खात्यामध्ये योग्य समन्वय असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. खडकवासला धरणातून सोडण्यात येणाऱ्या पाण्यामुळे दौंड-इंदापूर या भागात परिस्थिती नियंत्रणाखाली असल्याचेही त्यांनी सांगितले.