पुण्यातील मानवशास्त्राच्या दुर्मिळ संग्रहालयाचा रौप्य महोत्सव; शुक्रवारी सर्वांसाठी खुले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2017 11:58 AM2017-12-14T11:58:50+5:302017-12-14T12:06:28+5:30
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील मानवशास्त्राच्या दुर्मिळ संग्रहालयाचा रौप्य महोत्सव असल्याच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी संग्रहालय सर्वांना पाहण्यासाठी खुले असेल.
पुणे : महाराष्ट्रात मानवशास्त्र या विषयाचा एकमेव विभाग सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात आहे, या विभागातील दुर्मिळ संग्रहालयास २४ वर्षे पूर्ण होऊन रौप्यमहोत्सवी वर्ष सुरू झाले आहे. त्यानिमित्त येत्या शुक्रवारी सकाळी ११ ते सायंकाळी ६ या वेळेत ते नागरिकांना पाहण्यासाठी खुले ठेवण्यात येणार आहे.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या आंबेडकर भवनमधील तळमजल्यावर हे संग्रहालय आहे. या संग्रहालयात महाराष्ट्रातील ४५ आदिवासी जमाती तसेच, देशाच्या इतर राज्यांतील अनेक आदिवासी जमातींशी संबंधित एक हजारांहून अधिक वस्तूंचा समावेश आहे. मानवशास्त्र विभागाच्या पहिल्या विभागप्रमुख व या विषयासंबंधी मूलभूत कार्य करणाऱ्या दिवंगत डॉ. इरावती कर्वे यांचा येत्या शुक्रवारी जन्मदिवस आहे, त्यानिमित्त हे संग्रहालय नागरिकांसाठी खुले ठेवण्यात आले आहे अशी माहिती विभागप्रमुख डॉ. शौनक कुलकर्णी यांनी दिली.
मानवशास्त्र विभागाची स्थापना डेक्कन महाविद्यालयामध्ये १९३९ मध्ये करण्यात आली होती. त्यानंतर १९६३ मध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात हा विभाग सुरू करण्यात आला. १९९३ मध्ये या विभागामध्ये मानवशास्त्र विषयाशी संबंधित वस्तूंचे संग्रहालय सुरू करण्यात आले. या संग्रहालयात आदिवासींकडून वापरल्या जाणाऱ्या अनेक दुर्मिळ वस्तू ठेवण्यात आल्या आहेत.