सिल्व्हर ज्युबिली उपजिल्हा रुग्णालय : वैद्यकीय अधिकारी ‘गैरहजर’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 10, 2017 02:31 AM2017-08-10T02:31:53+5:302017-08-10T02:32:07+5:30
शहरातील ३ शासकीय रुग्णालयांमुळे परिसरातील रुग्णांची सोय झाली आहे. बाह्यरुग्ण तपासणीची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. या सरकारी रुग्णालयाच्या सर्व सोयींयुक्त देखण्या इमारती आहेत.
बारामती : शहरातील ३ शासकीय रुग्णालयांमुळे परिसरातील रुग्णांची सोय झाली आहे. बाह्यरुग्ण तपासणीची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. या सरकारी रुग्णालयाच्या सर्व सोयींयुक्त देखण्या इमारती आहेत. रुग्णांची संख्या वाढत असताना तज्ज्ञ वैद्यकीय अधिकाऱ्यांची कमतरता आहे. या ‘रिक्त’ जागा तातडीने भरण्याची मागणी होत आहे.
सध्या तरी तातडीच्या शस्त्रक्रियांसाठी खासगी डॉक्टरांना ‘आॅन कॉल’ बोलवावे लागते. त्यामुळे अनेकदा रुग्णांची गैरसोय होते. तर, कार्यरत वैद्यकीय अधिकाऱ्यांचीच कसरत मोठ्या प्रमाणात होते. सध्याच्या मंजूर ७४ जागांपैकी ५३ जागा भरलेल्या आहेत. २१ जागा रिक्त आहेत.
बारामती शहरातील पूर्वीचे नगरपालिकेचे सिल्व्हर ज्युबिली हॉस्पिटल राज्य सरकारकडे हस्तांतरित करण्यात आले. या रुग्णालयाला उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा मिळाला आहे. ३०० बेडची सुविधा या रुग्णालयात होणार आहे. बेडची संख्या वाढत असतानाच सर्व रोगांवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांची नेमणूक करणेदेखील महत्त्वाचे आहे. यारुग्णालयात रुग्ण दाखल करून घेण्यासाठी १०० बेडची क्षमता आहे. वाढीव २०० बेडची मान्यता आली आहे. तसा अध्यादेश प्राप्त झाला आहे. या रुग्णालयात फिजिओथेरपी, दंतरोग, टीबी समुपदेशन केंद्र, प्रसूती, कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया आदी सुविधा दिल्या जातात. दररोज ५०० पेक्षा अधिक बाह्यरुग्णांची तपासणी केली जाते. त्याचबरोबर ३० ते ४० रुग्णांना रुग्णालयात दाखल करून उपचार केले जातात. वातानुकूलित औषध भांडार, सर्पदंश, श्वानदंशावरील लशी उपलब्ध असतात. १ वर्ष वयोगटातील बालक, गरोदर माता, ज्येष्ठ नागरिकांना मोफत रक्तपुरवठा केला जातो. रुग्णांच्या सेवेसाठी १०८ अॅम्ब्युलन्सची मोफत सेवा आहे. या रुग्णालयात दरमहा किमान ५० ते ६० महिलांची प्रसूती केली जाते.
भूलतज्ज्ञ, फिजिशिअन, दंतचिकित्सक ही पदे रिक्त आहेत. फिजिशियन म्हणून नियुक्त झालेले डॉ. सोनवणे यांनी नियुक्त झाल्यानंतर एका महिन्यातच राजीनामा दिला. तेव्हापासून ही जागा रिक्तच आहे. अपघात कक्षातील तज्ज्ञ वैद्यकीय अधिकारीपदे भरलेली आहेत; मात्र डॉ. ए. एस. वैद्य प्रतिनियुक्तीवर औंध रुग्णालयात कार्यरत आहेत. डॉ. प्रज्ञा खोमणे गैरहजर आहेत. डॉ. अतुल वणवे, डॉ. प्रियंका धादवड यांनी राजीनामा दिला आहे. त्यांचा राजीनामा मंजूर झालेला नाही, तरीदेखील ते दोघेही कार्यरत नाहीत, अशी स्थिती आहे. आहारतज्ज्ञ १, रक्तपेढी तंत्रज्ञ २, ईसीजी तंत्रज्ञ १, औषधनिर्माता १, प्रयोगशाळा सहायक १, प्रशासकीय अधिकारी वर्ग २ -१ आदी पदे रिक्त आहेत. त्यामुळे प्रशिक्षणार्थी डॉक्टरांसह उपलब्ध वैद्यकीय अधिकाºयांवर रुग्णालय चालवावे लागते. रिक्त पदांमुळे बारामती शहरातील खासगी डॉक्टरांना ‘आॅन कॉल’ बोलवावे लागते. यामध्ये डॉ. महादेव स्वामी, डॉ. अंजली खाडे, डॉ. चंद्रशेखर टेंगळे, भूलतज्ज्ञ डॉ. सुजीत अडसूळ आणि डॉ. अजित देशमुख यांचा समावेश आहे. या डॉक्टरांना त्यांच्या रुग्णालयाचा भार संभाळून सरकारी दवाखान्यातील रुग्णांवर उपचार करावे लागतात. पूर्वी हे हॉस्पिटल नगरपालिकेच्या मालकीचे होते. हस्तांतर करताना काही कर्मचाºयांना या रुग्णालयाच्या सेवेत ठेवले आहे; मात्र त्यांना आरोग्य खात्याच्या वेतन श्रेणीनुसार वेतन दिले जात नाही.
मुख्य वैद्यकीय अधीक्षकपदी डॉ. काळे
मुख्य वैद्यकीय अधीक्षकांची नुकतीच बदली होऊन इंदापूर उपजिल्हा रुग्णालयाचे डॉ. सदानंद काळे यांची मुख्य वैद्यकीय अधीक्षक म्हणून नियुक्ती झाली आहे. (दि. ८) त्यांनी या रुग्णालयाचा पदभार घेतला. कर्मचाºयांनी त्यांचे स्वागत केले. त्याचबरोबर अनेक वर्षांपासून रिक्त असलेल्या जनरल सर्जनसाठी डॉ. बोराडे यांची आणि अस्थिरोगतज्ज्ञ म्हणून डॉ. रोहन खवटे यांची नियुक्ती झाली आहे.
नेत्रदान, अवयवदानाची सुविधा..
बारामतीच्या सिल्व्हर ज्युबिली उपजिल्हा रुग्णालयात मरणोत्तर नेत्रदान करण्याची सोय आहे. त्याचबरोबर अवयवदानाचीदेखील सोय करण्यात आली आहे.
आतापर्यंत नेत्रदानाचा संकल्प केलेल्या दात्यांमुळे बारामती परिसरातील ६ जणांना नवी दृष्टी मिळाली आहे. पुणे जिल्ह्यात अशी सुविधा असणारे हे पहिलेच रुग्णालय आहे.
फक्त गरोदर महिलांसाठी सोनोग्राफी..
तज्ज्ञ डॉक्टर नसल्याने या रुग्णालयात गरोदर मातांची सोनोग्राफी करण्याची सुविधा आहे. अन्य रुग्णांना खासगी सोनोग्राफी सेंटरमध्ये जाऊन सोनोग्राफी करावी लागते. त्यामुळे सोनोग्राफीसाठी तातडीने स्वतंत्र वैद्यकीय अधिकारी नेमण्याची मागणी अनेकदा करण्यात आली आहे.
रुग्णालयात पोलीस चौकी हवी
अपघातासह तातडीच्या उपचारांसाठी दाखल झालेल्या रुग्णांना तज्ज्ञ डॉक्टर नसल्याने प्रथमोपचार करून खासगी रुग्णालयात न्यावे लागते. त्यामुळे अनेकदा रुग्णांचे नातेवाईक आक्रमक होतात. काही वेळा संतप्त जमावाने रात्रीच्या वेळी ड्युटीवर असलेल्या डॉक्टरांना मारहाण केल्याचे प्रकार घडले आहेत. त्यामुळे हॉस्पिटल परिसरातच २४ तास पोलीस चौकी असावी, तसेच रुग्णांच्या सुरक्षेसाठी सिक्युरिटी गार्डदेखील असावेत, अशी मागणी आहे.