Pune | नदीपात्रात कारमध्ये ठेवली चांदीची पूजेची भांडी अन् चोरट्यांनी साधला डाव
By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2023 10:05 AM2023-03-27T10:05:26+5:302023-03-27T10:06:38+5:30
कारची काच फोडून आतील मौल्यवान वस्तू, ऐवज चोरून नेण्याच्या घटना लागोपाठ तीन डेक्कन परिसरात घडल्या आहेत...
पुणे : पत्नीच्या दुकानात पूजा असल्याने वडिलोपार्जित चांदीची भांडी आणली. ही पूजा झाल्यावर ऑफिसला जायचे असल्याने चांदीची भांडी कुठे ठेवावी ? दुकानात ठेवली तर गहाळ होतील, असा विचार करून त्यांनी ही पूजेची भांडी कारमध्येच ठेवली. ऑफिसच्या खाली कार पार्क केली अन् चोरट्यांनी नेमका डाव साधला.
कारची काच फोडून आतील मौल्यवान वस्तू, ऐवज चोरून नेण्याच्या घटना लागोपाठ तीन डेक्कन परिसरात घडल्या आहेत. या तीन घटनेत दोन लॅपटॉप, चांदीची भांडी असा दीड लाखांचा ऐवज चोरीला गेला. लॅपटाॅप चोरीला गेल्याने दोघा तरुणांच्या कार्यालयीन कामावरही त्याचा परिणाम झाला आहे.
याबाबत हांडेवाडीत राहणाऱ्या एका ३४ वर्षांच्या तरुणाने डेक्कन पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ते जंगली महाराज रोडवरील एका कंपनीत वरिष्ठ व्यवस्थापक आहेत. त्यांच्या पत्नीचा मेकअप स्टुडिओ आहे. तेथे धार्मिक विधी होता. त्यासाठी त्यांनी वडिलोपार्जित चांदीची भांडी आणली होती. पूजा झाल्यानंतर दुकानात ही भांडी ठेवण्याऐवजी त्यांनी कारमध्ये चालकाच्या शेजारच्या सीटवर ठेवली. जंगली महाराज रोडवरील गल्लीत कार पार्क केली. ते कार्यालयात गेले. सायंकाळी परत घरी जाण्यासाठी आले. तेव्हा त्यांच्या कारची काच फोडून पूजेची चांदीची भांडी चोरट्याने चोरून नेली होती.
लोहगाव येथे राहणारा तरुण एका कंपनीत असोसिएट पार्टनर आहे. तो मित्रांना भेटण्यासाठी डेक्कनला आला होता. भिडे पुलाजवळील नदी पात्रातील ओंकारेश्वर मंदिराकडे जाणाऱ्या रोडवर त्यांनी सायंकाळी आपली कार पार्क केली. मित्राला भेटून रात्री पावणेदहा वाजता परत आले. तेव्हा चोरट्याने त्यांच्या कारची काच फोडून ८५ हजार रुपयांचा लॅपटॉप चोरून नेला.
भोसरी येथे राहणारे ३९ वर्षांचे फिर्यादी हे मुंबईतील कंपनीत झोनल सेल्स मॅनेजर आहेत. त्यांनी २४ मार्च रोजी दुपारी डेक्कन येथील नदीपात्रातील पार्किंगच्या जागेत कार पार्क केली. ते कामासाठी सदाशिव पेठेत गेले. सायंकाळी सात वाजता परत आले. दरम्यानच्या काळात चोरट्यांनी कारची काच फोडून लॅपटॉप व अन्य साहित्य चोरून नेले.
नदीपात्रात कार पार्क करताय, सावधान!
शहरात पार्किंगला जागा नसल्याने अनेकजण नदीपात्रात कार पार्क करून जवळच्या ठिकाणी कामाला जातात. पण, या संधीचा चोरटे फायदा घेत असून एका पाठोपाठ कारच्या काचा फोडून चोऱ्या करताना दिसत आहेत. या परिसरात सीसीटीव्ही नसल्याने चोरट्यांचे फावत आहे.