समान पाणी योजनेतून राष्ट्रवादीचे घूमजाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2017 07:47 AM2017-07-26T07:47:00+5:302017-07-26T07:47:02+5:30
समान पाणी योजनेबाबत राष्ट्रवादी काँग्रेसच्या धरसोड भूमिकेची महापालिका वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे. सत्तेत असताना राष्ट्रवादी काँग्रेसने विरोधातील भाजपाला बरोबर घेत या योजनेला मंजुरी दिली
पुणे : समान पाणी योजनेबाबत राष्ट्रवादी काँग्रेसच्या धरसोड भूमिकेची महापालिका वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे. सत्तेत असताना राष्ट्रवादी काँग्रेसने विरोधातील भाजपाला बरोबर घेत या योजनेला मंजुरी दिली, मात्र आता सत्ता गेल्यानंतर विरोध केला जात आहे. संधिसाधू अशा शब्दांत भाजपा व अन्य पक्षांकडून राष्ट्रवादीच्या या कृतीचे वर्णन केले जात आहे.
राष्ट्रवादीच्या सत्ताकाळातच या योजनेला मंजुरी देण्यात आली. काँग्रेसने त्या वेळी सत्तेतील घटक असूनही काही मुद्द्यांवर विरोध केला होता. तो डावलून राष्ट्रवादी काँग्रेसने त्या वेळी विरोधात असलेल्या भाजपाचे साह्य घेतले व बहुमताने ही योजना मंजूर केली. त्याच वेळी योजनेसाठी कर्जरोखे काढले जाणार आहेत, केंद्र व राज्य सरकारकडून निधी मिळणे शक्य नाही, रस्ते खोदले जाणार आहेत, टाक्यांच्या कामाच्या निविदेत काही शंकास्पद प्रकार घडले आहेत, एकाच कंपनीला प्राधान्य दिले जात आहे. हे सर्व प्रकार उघडपणे बोलले जात होते. मात्र त्याकडे दुर्लक्ष करीत राष्ट्रवादी काँग्रेसने योजना मंजूर केली.
आता मात्र नेमक्या याच मुद्द्यांवरून राष्ट्रवादी काँग्रेसने योजनेला विरोध सुरू केला आहे. या योजनेत शहरातंर्गत सर्व जलवाहिन्या बदलल्या जाणार आहेत. त्या कामाची १ हजार ८०० कोटी रुपयांची
निविदा नुकतीच प्रसिद्ध करण्यात आली. त्यात गैरव्यवहार झाल्याचा आरोप राष्ट्रवादीकडून करण्यात येत आहे. कर्जरोख्यांबाबतही राष्ट्रवादीने शंका निर्माण केली आहे. योजनेला मंजुरी देण्यात आली, त्या प्रस्तावातच या सर्व गोष्टींचा उल्लेख होता. तरीही त्यांनी त्या वेळी त्याकडे दुर्लक्ष केले. त्यातुलनेत काँग्रेस पक्षाचा विरोध मात्र कायम मुद्देसूद व टोकाचा राहिला आहे. त्यामुळे तर राष्ट्रवादी काँग्रेसचा सुरुवातीचा पाठिंबा व आताचा विरोध हा महापालिका वर्तुळात जास्त चर्चेचा विषय झाला आहे.
व्याजाचा
भुर्दंड थेट पुणेकरांवर
१ या योजनेला बहुसंख्य वरिष्ठ अधिकाºयांचा विरोध आहे. त्यांच्यामध्येही राष्ट्रवादी काँग्रेसच्या धरसोडपणाची चर्चा आहे. आवश्यकता नसताना केवळ केंद्र व राज्यातील काही वरिष्ठ राजकारण्यांच्या आग्रहातून ही योजना पुणेकरांवर लादण्यात आली, असे अधिकाºयांचे मत
आहे. २ राष्ट्रवादी काँग्रेसने त्यांच्या सत्ताकाळातच टोकाचा विरोध केला असता तर आता ही वेळ आलीच नसती, असे त्यांच्यातील काहींनी खासगीत बोलताना सांगितले. आता तर फक्त २०० कोटी रुपयांचे कर्ज काढले आहे, कामाला सुरुवात झाल्यानंतर ठेकेदार कंपनीची बिले अदा करण्यासाठी आणखी कर्ज काढले जाईल व त्याच्या व्याजाचा भुर्दंड महापालिकेवर, पर्यायाने पुणेकरांवर बसेल असे या अधिकाºयांचे मत आहे.३ भाजपाने आयोजित केलेल्या टाक्यांच्या कामाच्या उद््घाटन कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेसने घातलेल्या वादामुळे भाजपातही राष्ट्रवादीच्या विरोधात तीव्र नाराजी निर्माण झाली आहे. या कामाच्या निविदा प्रक्रियेत भ्रष्टाचार झालाच असेल तर तो त्यांच्या सत्ताकाळात झाला आहे. ४ आम्ही कामाचे व्यवस्थित नियोजन केले, त्यासाठीचे कार्यक्रम आयोजित केले तर त्यांनी आंदोलन करण्याचे कारण नव्हते, मात्र त्यांनी त्या वेळी मनात जे ठेवले होते, ते आता आमच्या सत्ताकाळात होत नसल्यानेच त्यांचा राग आहे व विरोध त्यामुळे होत आहे असे भाजपाच्या काही नेत्यांनी सांगितले.