साधेपणाने विवाह केल्याने पैशांची होतेय मोठी बचत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2021 04:11 AM2021-05-22T04:11:10+5:302021-05-22T04:11:10+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : कोरोना आपत्तीमुळे मार्च २०२० च्या शेवटच्या आठवड्यापासून सर्वत्र लॉकडाऊन व कोरोना संसर्गाच्या भीतीचे वातावरण ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : कोरोना आपत्तीमुळे मार्च २०२० च्या शेवटच्या आठवड्यापासून सर्वत्र लॉकडाऊन व कोरोना संसर्गाच्या भीतीचे वातावरण निर्माण झाले. याचा मोठा परिणाम लग्नसमारंभ घटण्यावर झाला असला तरी, गेल्या १४ महिन्यांच्या काळात काहींनी साधेपणाने लग्नसमारंभ करण्यास मोठी पसंती दिली.
मोजक्या नातेवाइकांच्या उपस्थितीत व साधेपणाने लग्नसमारंभ केल्यास लाखो रुपयांची बचत होतीच; पण हीच लाखो रुपयांची रक्कम त्या दाम्पत्याच्या भावी आयुष्यासाठी एक ठेव म्हणूनही जमा करता आल्याने अनेकांनी समाधान व्यक्त केले आहे.
विवाह नोंदणी संस्थेकडे असलेल्या नोंदणीनुसार मार्च, २०२० पासून डिसेंबर, २०२० पर्यंत शहरात ३८०० तर जानेवारी २०२१ ते मार्च, २०२१ पर्यंत २ हजार ३१ विवाह नोंदणी पद्धतीने झाले आहेत़
दरम्यान पुणे महापालिकेकडे साधारणत: दरवर्षी पाच हजारांच्या आसपास विवाह नोंदणी प्रमाणपत्रे दिली जातात; परंतु या दोन वर्षांच्या काळात अनेकांनी अद्यापही विवाह नोंदणी केली नसल्याने, शहरात निश्चित किती विवाह झाले याची आकडेवारी स्पष्ट होत नाही. त्यातच अनेक क्षेत्रीय कार्यालयातील नागरी सुविधा केंद्रांमधील कर्मचारी वर्ग हा कोविड-१९ च्या कामात व्यस्त असल्याने हे नोंदणीचे कामही वर्षभर थांबले गेले आहे. तर जी नोंदणी झाली आहे, तिचे प्रमाणही खूपच कमी आहे.
---------------
चौकट १
शहरातील जन्म-मृत्यू नोंदणीची जानेवारी २०१९ पासूनची आकडेवारी पाहता जन्मदर हा मृत्यूदरापेक्षा कोरोना आपत्तीतही जास्तच राहिला आहे. सन २०२० मध्ये वर्षभरात ५० हजार ५४४ जणांचा जन्म झाल्याची नोंद आहे. तर याच काळात ३८ हजार १९४ जणांचा मृत्यू झाला आहे. यामुळे साधारणत: १२ हजाराने मृत्यूपेक्षा जन्माची संख्या ही जास्तच आहे़
----------------
वर्ष जन्म मृत्यू
२०१९ ५२,६६९ ३२,३५३
२०२० ५०,५४४ ३८,१९४
--------------------
चौकट १
कोरोना आपत्तीमुळे सप्टेंबर, २०२० अखेर रखडलेले लग्नसमारंभ कोरोना संसर्ग ओसरल्याने, नोव्हेंबर, २०२० पासून पुन्हा सुरू झाले. डिसेंबर, २०२०, जानेवारी ते फेब्रवारी २०२१ पर्यंत लग्न समारंभांना शासनाने १०० जणांच्या उपस्थितीचे बंधनही कायम ठेवले होते; परंतु ते अनेकांनी न पाळल्याने व त्यातच मार्च, २०२१ पासून पुन्हा कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची सुरुवात झाल्याने, लग्न समारंभांवर मोठ्या प्रमाणात बंधने आली. २५ लोकांच्या उपस्थितीतच लग्नसमारंभ पार पाडण्याचा आदेश शासनाने दिला़. परिणामी या काळात होणारे नियोजित लग्नसमारंभ पुढे ढकलली गेली आहे.
----------------------------------