१५ पोलीस पथकांची एकाचवेळी ५ शहरांत छापे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2021 04:08 AM2021-06-18T04:08:45+5:302021-06-18T04:08:45+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : जळगाव येथील भाईचंद हिराचंद रायसोनी (बीएचआर) बँकेच्या फसवणूक व अपहारप्रकरणी पुणे पोलीस दलाच्या आर्थिक ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : जळगाव येथील भाईचंद हिराचंद रायसोनी (बीएचआर) बँकेच्या फसवणूक व अपहारप्रकरणी पुणे पोलीस दलाच्या आर्थिक गुन्हे शाखेने गुरुवारी जळगाव, धुळे, औरंगाबाद, मुंबई आणि पुणे शहरात एकाच वेळी १५ पथकांच्यामार्फत कारवाई करून १२ जणांना ताब्यात घेतले.
मद्य व्यावसायिक भागवत भंगाळे, जामनेर पंचायत समितीचे माजी सभापती छगन झाल्टे (रा. जामनेर), जामनेर शिक्षण संस्थेचे सचिव जितेंद्र पाटील, राजेश लोढा (रा. जामनेर), अंबादास मानकापे (रा. औरंगाबाद), जयश्री अंतिम तोतला, संजय तोतला (रा. मुंबई), प्रमोद कापसे (रा. अकोला), प्रितेश चंपालाल जैन (रा. धुळे), असिफ मुन्ना तेली (रा. भुसावळ), प्रेम नारायण कोगटा (रा. जळगाव) यांचा ताब्यात घेतलेल्यांमध्ये समावेश आहे.
पोलिसांनी ताब्यात घेतलेले हे आरोपी मातब्बर असून, त्यातील काहींची पार्श्वभूमी राजकीय तर काहींची व्यावसायिक असल्याचे सांगितले जाते. भागवत भंगाळे हे हॉटेल व्यावसायिक असून, त्यांच्या २५ पेक्षा अधिक बिअर शॉपी आहेत. छगन झाल्टे हे जामनेर पंचायत समितीचे माजी सभापती असून नगरसेवक देखील होते. जितेंद्र पाटील हे शिक्षण सम्राट असून जामनेर तालुका शिक्षण संस्थेचे पदाधिकारी आहेत. त्यांची पत्नी नगरसेविका आहे. भुसावळ येथील आसिफ तेली हे माजी नगरसेवक आहे.
जयश्री मणियार या ‘प्लास्टो’चे प्रमुख उद्योगपती श्रीकांत मणियार यांच्या सून आहेत. संजय तोतला हे जळगाव स्थित मोठे व्यावसायिक आहेत. प्रेम कोगटा हे जळगाव येथील दाल मिल असोसिएशनचे पदाधिकारी असून मोठे व्यावसायिक आहेत. राजेश लोढा शिक्षण संस्थेचे संचालक आहेत. प्रितेश जैन भुसावळ येथील व्यावसायिक आहेत. अंबादास मानकापे हे औरंगाबाद स्थित व्यावसायिक असून एका दैनिकाचे मालक असल्याचे सांगितले जाते.
बीएचआर पतसंस्थेचे अवसायक जितेंद्र कंडारे यानेच अवसायनात (लिक्विडेशन) काढलेल्या पतसंस्थेत मोठा गैरव्यवहार करून भ्रष्टाचार केला. त्याने अनेकांना त्यांच्या ठेवीच्या ३० ते ४० टक्के पैसे देऊन त्यांच्याकडून १०० टक्के पैसे मिळाल्याचे लिहून घेतले. आज पकडण्यात आलेल्यांनी बीआरएच पतसंस्थेकडून घेतलेल्या कर्जाच्या बदल्यात ठेवीदारांना त्यांच्या ठेवीच्या ३० ते ४० टक्के पैसे देऊन त्यांना १०० टक्के पैसे परत केल्याचे दाखविले. त्यातून आपले कर्जाची परतफेड केल्याचे दाखविले असा आरोप आहे.
पोलीस उपायुक्त भाग्यश्री नवटके यांच्या नेतृत्वाखाली गेल्यावर्षी नोव्हेंबर महिन्यात जळगावमध्ये एकाचवेळी अनेक ठिकाणी कारवाई केली होती. त्यातून बीएचआर पतसंस्थेमधील घोटाळ्यातील अनेक जणांना पकडण्यात आले होते. तसेच मोठ्या प्रमाणावर कागदपत्रे हस्तगत करण्यात आली होती. त्यानंतर आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने जळगाव जिल्ह्यात अनेक वेळा कारवाई केली आहे. नोव्हेंबरप्रमाणेच आज पुन्हा एकदा मोठी कारवाई पुणे पोलिसांनी केल्याने शहरात खळबळ उडाली आहे.
चौकट
शंभर कोटींचा गैरव्यवहार
मुंबई, पुणे आणि औरंगाबादेतून ताब्यात घेतलेल्या चौघांना गुरुवारी पुण्यात आणून अटक केली. त्यांना सायंकाळी उशिरा न्यायालयात हजर करण्यात आले आहे. पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या १२ जणांकडील कर्ज व त्यांनी ठेवीदारांचा केलेला विश्वासघात याची रक्कम सुमारे १०० कोटी रुपयांपर्यंत असल्याचे आजवरच्या तपासात पुढे आले आहे.
चौकट
५ शहरांत एकाचवेळी २ तासांत कारवाई
पुणे शहरातून १६ गाड्यांतून १५ पथके बुधवारी दुपारी पुण्यातून वेगवेगळ्या शहरांत रवाना झाले होते. त्यांना गुरुवारी सकाळी ६ वाजता नेमून दिलेल्या ठिकाणी पोहोचण्यास सांगण्यात आले. त्यानंतर गुरुवारी सकाळी ६ वाजता एकाचवेळी वेगवेगळ्या शहरांत पोलिसांच्या या पथकांनी छापेमारी सुरू केली. सुमारे २ तासांत सर्वांना ताब्यात घेण्यात आले. पहिल्या कारवाईतही आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलीस पथकाने छापे घालेपर्यंत कोणाला सुगावा लागू दिला नव्हता. या वेळीही ही पथके त्यांना नेमून दिलेल्या ठिकाणापासून काही अंतरावर रात्रीच पोहचली. एका पथकात १ अधिकारी व ४ कर्मचाऱ्यांचा समावेश होता. या सर्व पथकांना पुण्यात बसून पोलीस उपायुक्त भाग्यश्री नवटके व त्यांचे सहकारी रात्रभर मार्गदर्शन करत होते.