'मविआ' कडून निवडणूक लढवली जाणार असल्याने भाजप गाफील राहणार नाही - चंद्रकांत पाटील
By ऑनलाइन लोकमत | Published: January 23, 2023 01:19 PM2023-01-23T13:19:25+5:302023-01-23T13:20:38+5:30
''आमची घोषणा गल्लीत नाही तर दिल्लीतून होणार'', पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चंद्रकांत पाटलांची महत्वाची बैठक
पुणे : आमदार मुक्ता टिळक यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेसाठी कसबा विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. या मतदारसंघावर भारतीय जनता पक्षाचे अनेक वर्षे वर्चस्व असले तरीही पोटनिवडणुकीत काँग्रेसला संधी मिळाल्याचा इतिहास आहे. काँग्रेसही लवकरच उमेदवार जाहीर करणार आहे. या पोटनिवडणुकीच्या रिंगणात संभाजी ब्रिगेड उतरले असून संभाजी ब्रिगेडचे पुणे शहराध्यक्ष अविनाश मोहिते यांनी पाठिंबा देऊन कसबा पोट निवडणूक लढवण्याचे ठरवले आहे. भाजपने आजपासून जोरदार हालचाली सुरु केल्या आहेत. या पोटनिवडणूकीच्या पार्श्वभूमीवर पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी महत्वाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. महाविकास आघाडीकडून निवडणूक लढवली जाणार असल्यामुळे आम्ही गाफील राहणार नाही. आमची घोषणा गल्लीत नाही तर दिल्लीतून होणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले आहे.
पाटील म्हणाले, सर्व पक्षांनी निवडणूक लढवणार हे सूचित केल्यानंतर भाजपने तयारी सुरू केली आहे. निवडणुका बिनविरोध होण्यासाठी प्रयत्न करणार असून आम्ही अंधेरी पोटनिवडणूक बिनविरोध केली. महाविकास आघाडीकडून निवडणूक लढवली जाणार असल्यामुळे आम्ही गाफील राहणार नाही. इच्छुक उमेदवाराची नावे पाठवण्यात येणार असून त्यातील तीन नावे निवडून विचार केला जाणार आहे.
पोटनिवडणुकीचे नेतृत्व जगदीश मुळीक करणार
आमच्या कार्यपद्धतीनुसार कामे सुरु केली आहेत. कसबा आमच्या हक्काचा मतदार संघ असल्याने आम्ही जोरदार तयारी करणार आहोत. पुढील महिन्यातील पोटनिवडणुकीचे नेतृत्व माजी आमदार जगदीश मुळीक करणार आहेत. तसेच खासदार गिरीश बापट यांच्या मार्गदर्शनाखाली निवडणूक लढवणार असून उमेदवारबाबत निर्णय कोरकमिटी घेणार आहे. उमेदवाराबाबत आताच्या बैठकीत कोणतीही चर्चा झाली नसल्याचे पाटलांनी यावेळी सांगितलं आहे.
असा आहे इतिहास
कसबा विधानसभा मतदारसंघ मागील अनेक वर्षे भाजपच्या ताब्यात आहेत. सलग ५ वेळा तिथून भाजपचे गिरीष बापट विजयी झाले. त्यांच्याही आधी अण्णा जोशी, त्याआधी अरविंद लेले या भाजपच्याच उमेदवारांनी तिथून निवडणूक जिंकली होती. १९९१ च्या लोकसभा निवडणुकीत अण्णा जोशी लोकसभेची निवडणूक जिंकली व ते खासदार झाले. त्यांनी आमदारकीचा राजीनामा दिला. त्या जागेवर प्रथमच पोटनिवडणूक झाली.
काय झाले होते पोटनिवडणुकीत?
काँग्रेसकडून माजी महापौर वसंत थोरात व भाजपकडून गिरीश बापट यांच्यात लढत झाली. त्यामुळे थोरात यांनी बापट यांचा पराभव केला. काँग्रेसला मिळालेला या मतदारसंघातील तो पहिलाच विजय. तो पोटनिवडणुकीत मिळाला होता. आता तोच इतिहास पुन्हा घडणार का अशी चर्चा राजकीय वर्तुळात आयोगाने निवडणूक कार्यक्रम जाहीर करताच सुरू झाली आहे.
निवडणूक २०१९ ची
मागील विधानसभा निवडणुकीत काँग्रेसकडून अरविंद शिंदे यांनी निवडणूक लढवली होती. त्यांचा मुक्ता टिळक यांनी भाजपकडून पराभव केला. शिंदे यांना ४७ हजार २९६ मते मिळाली. मुक्ता टिळक यांनी ७५ हजार ४९२ मते मिळवली. शिवसेनेचे बंडखोर विशाल धनवडे यांना १३ हजार ९८९ मते मिळाली. मुक्ता टिळक यांचा निवडणुकीत सहज विजय झाला होता. त्याच जागेवर आता पोटनिवडणूक होत आहे.
आयोगाकडून दे धक्का
निवडणूक आयोगाकडून लगेचच या जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर होईल, अशी कोणाचीच अपेक्षा नव्हती. त्यामुळे भाजपच काय, पण अन्य राजकीय पक्षांमध्येही ही जागा लढविण्याबाबत किंवा उमेदवार निश्चित करण्याबाबत काहीच चर्चा नव्हती. मात्र, बुधवारी आयोगाने अचानक कसबा मतदारसंघासाठी पोटनिवडणुकीचा रीतसर कार्यक्रमच जाहीर केला. त्यामुळे आता उमेदवारी कोण करणार याची चर्चा सुरू झाली आहे.