सिंधुताई सपकाळ यांच्या ९ लेकींना मिळाले आयुष्याचे जोडीदार
By ऑनलाइन लोकमत | Published: May 4, 2022 07:40 PM2022-05-04T19:40:25+5:302022-05-04T19:45:01+5:30
ममता बाल सदनमध्ये माईंच्या या लाडक्या ९ लेकींचा नुकताच थाटात साखरपुडा पार पडला
पुणे : संपूर्ण जगभर अनाथांची माय अशी ओळख असलेल्या पद्मश्री डॉ. स्व. सौ. सिंधुताई सपकाळ यांच्या ९ लेकींना आयुष्याचे जोडीदार मिळाले आहेत. पुणे जिल्ह्यातील कुंभारवळण येथील ममता बाल सदनमध्ये माईंच्या या लाडक्या ९ लेकींचा नुकताच थाटात साखरपुडा पार पडला. हयातीत असतानां त्यांनी आपल्या सोन्यासारख्या मानस कन्यांचे थाटात लग्न पार पडावे असं स्वप्न बघितलं होत. आज त्या नाहीयेत मात्र ममता बाल सदनने त्यांचं स्वप्न सत्यात उतरवलं आहे.
मुलगी उपवर झाली की आईच्या मनाला तिच्या लग्नाचे वेध लागतात. पुढच्या आयुष्याची वाटचाल करण्यासाठी तिला अनुरूप साथीदाराची गरज आहे हे जाणवतं. तरी त्याचबरोबर एकीकडे मन खूप हळवं बनते. असच काही माईंचं झालं होत. लहानाचं मोठं सांभाळलेल्या आपल्या लेकींना विवाहाच्या बंधनात अडकतांनाचे स्वप्न साकार होत आहे. हे नियतीला मान्य नसले तरी आज त्यांच्या पश्चात ९ लेकींना आयुष्याचे जोडीदार मिळाले आहेत.
रविवारी कुंभारवळण येथील ममता बाल सदनमध्ये ९ लेकींचा एकसाथ थाटात साखरपुडा पार पडला. परिसरात भव्य मंडप उभारण्यात आला होता. संस्थेच्या वतीने विधिवत पूजापाठसह साखरपुडाचे नियोजन करून उपवर मुलाला अंगठी, संपूर्ण पोशाख, श्रीफळ देऊन सोपस्कार पार पाडले. माईंच्या ९ मानस कन्यांच्या मामांनी उपवर मुलांच्या मामांचे संस्कुतीप्रमाणे कुमकुम तिलक लावून श्रीफळ देऊन यथोचित सन्मान केला.
यावेळी आमदार संजय जगताप यांच्या सौभाग्यवती राजवर्धिनी जगताप, माजी राज्यमंत्री विजयबापू शिवतारे यांची कन्या ममता शिवतारे, पंचायत समिती सदस्य सुनीताताई कोलते, चिंतामणी हॉस्पिटल सासवड येथील डॉ. वांढेकर, डॉ. वाघोलीकर, डॉ. रावळ, कुंभारवळणचे सरपंच अश्विनी खळदकर, माजी सरपंच अमोल कामठे, देविदास कामठे यांच्यासह पंचक्रोशीतील सर्व ग्रामस्थांनी उपस्थित राहून मुलींना आशीर्वाद दिले.