एकेक किरण तेजाचा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 9, 2021 04:13 AM2021-09-09T04:13:35+5:302021-09-09T04:13:35+5:30

अभिजित कोळपे पूर्वी यूपीएससीचे मुख्य परीक्षेचे पेपर तुलनेने अवघड, कठीण होते. गेल्या पाच-सहा वर्षांत मात्र या अभ्यासक्रमात मोठा बदल ...

A single ray of radiance | एकेक किरण तेजाचा

एकेक किरण तेजाचा

googlenewsNext

अभिजित कोळपे

पूर्वी यूपीएससीचे मुख्य परीक्षेचे पेपर तुलनेने अवघड, कठीण होते. गेल्या पाच-सहा वर्षांत मात्र या अभ्यासक्रमात मोठा बदल झाला आहे. त्यामुळे आता पूर्व परीक्षा कठीण झाली आहे. त्यामुळे अभ्यास करताना विद्यार्थ्यांनी हा बदल लक्षात घ्यायला हवा. तसेच बदलत्या परीक्षा पद्धतीनुसार विद्यार्थ्यांनी बदलायला हवे. त्याचबरोबर आपल्याला गती कशात आहे, हे समजणे फार गरजेचे आहे. कारण यूपीएससी किंवा एमपीएससीच्या परीक्षेत प्रचंड स्पर्धा निर्माण झाली आहे. प्रत्येक विद्यर्थ्यांनी स्वत:ला ओळखत परीक्षा पद्धती, स्वत:च्या चुका समजून घ्याव्यात. तरच केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (यूपीएससी) परीक्षेत यशस्वी होता येईल, असे भारतीय आयकर विभागातील (आयआरएस) सहायक आयुक्त धीरज मोरे सांगतात.

मध्य प्रदेश येथील इंदूर येथे सहायक आयुक्त या पदावर धीरज मोरे हे कार्यरत आहेत. धुळे जिल्ह्यातील निमगूळ हे त्यांचे मूळ गाव आहे. वडील पाटबंधारे खात्यातून तर आई मुख्याध्यापिका या पदावरून सेवानिवृत्त झाले आहेत. दोघांनीही प्रथमपासून स्पर्धा परीक्षांची तयारीसाठी पाठबळ, प्रोत्साहन दिले आहे. पुण्यातील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातून त्यांनी एम. टेकमध्ये पदवी शिक्षण घेतले आहे.

यूपीएससीची तयारी करताना मी उलट्या क्रमाने अभ्यास केला. जनरली विद्यार्थी सुरुवातीला पूर्व परीक्षा, त्यानंतर मुख्य परीक्षेचा अभ्यास तर, शेवटी मुलाखतीची तयारी करतात. मी मात्र सुरुवातीला मुख्य परीक्षेचा बऱ्यापैकी अभ्यास केला. त्यानंतर पूर्व परीक्षेची तयारी सुरू केली. कारण नंतर प्रत्यक्ष परीक्षेच्या वेळी त्याची उजळणी करताना चांगला फायदा झाल्याचे धीरज मोरे सांगतात.

संदर्भ साहित्य वापरताना मुख्य परीक्षेसाठी सामान्य अध्ययन १, २, ३ आणि ४ या चारही पेपरसाठी मुख्यत: शालेय स्तरावरील इयत्ता पाचवी ते बारावीपर्यंतची मूळ पुस्तके वाचणे आवश्यक आहे. त्यानंतर प्रत्येक विषयाची बाजारात उपलब्ध असणाऱ्या विविध मान्यवर लेखकांची पुस्तके ही वरिष्ठ अधिकारी, मित्र अथवा संबंधित तज्ज्ञ शिक्षकांच्या सल्ल्याने यादी घेऊन ती वापरावीत. बाजारात एकाच विषयावर विविध लेखकांची खूप सारी पुस्तके असतात. त्यातील कोणतेही पुस्तके न घेता तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसारच वाचावीत. अन्यथा तुमचा वेळ अनावश्यक वाया जाऊ शकतो. त्यामुळे काळजी घेणे गरजेचे आहे, असा सल्ला धीरज मोरे देतात.

पूर्व असो की मुख्य परीक्षा, या दोन्हीसाठी प्रचंड लेखन सराव गरजेचा आहे. कारण यूपीएससीच्या परीक्षेत पेपर सोडवण्यासाठी वेळेचे नियोजन अत्यंत आवश्यक आहे. बऱ्याच वेळा आपण खूप पुस्तके वाचलेले असतात. मात्र, प्रत्यक्ष अंतिम परीक्षेच्या वेळी त्या तीन तासांत ते सर्व मांडताना धावपळ होते. त्यामुळे पेपर सोडवताना अनेक मुद्दे राहून जातात. त्याचा परिणाम आपल्याला मिळणाऱ्या गुणांवर होत असताे.

मुलाखतीला सामोरे जाण्यापूर्वी डिटेल ॲप्लिकेशन फॉर्ममधील प्रत्येक शब्दाबद्दल आपल्याला माहिती हवी. त्यातील प्रत्येक शब्दाचे किती अर्थ निघतात. त्याचे काही वैशिष्ट्य आहेत का, हे आपल्याला माहिती असणे आवश्यक आहे. या फॉर्मच्या आधारेच यूपीएससीचे पॅनलमधील सदस्य हे प्रश्न विचारत असतात. त्या फॉर्ममध्ये भरलेली माहितीच जर आपल्याला माहिती नसेल किंवा आपल्याला त्यावर काही बोलता येत नसेल तर त्याचा नकारात्मक परिणाम होऊ शकतो. मुलाखतीला जाताना या गोष्टींवर काम करायला हवे.

फोटो : धीरज मोरे

Web Title: A single ray of radiance

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.