एकेक किरण तेजाचा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 3, 2021 04:09 AM2021-06-03T04:09:21+5:302021-06-03T04:09:21+5:30

अपयशाची कारणे शोधून सुधारणा केल्यास हमखास यश : निखिल पिंगळे अभिजित कोळपे कोणत्याही प्रकारची स्पर्धा परीक्षा यापूर्वी दिली नसल्याने ...

A single ray of radiance | एकेक किरण तेजाचा

एकेक किरण तेजाचा

Next

अपयशाची कारणे शोधून सुधारणा केल्यास हमखास यश : निखिल पिंगळे

अभिजित कोळपे

कोणत्याही प्रकारची स्पर्धा परीक्षा यापूर्वी दिली नसल्याने केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (यूपीएससी) परीक्षेत पहिल्या प्रयत्नात अपयश आले. त्याची कारणे शोधून त्यात सुधारणा केल्या. तसेच, यूपीएससीच्या मागील काही वर्षांतील पेपरचे तुलनात्मक (अनॅलिसिस) आकलन केले. पहिल्या प्रयत्नात अभ्यास करताना नोट्स काढल्या होत्या. त्याचा चांगला फायदा झाला. त्यामुळे केवळ दुसऱ्याच प्रयत्नात यूपीएससीच्या परीक्षेत संपूर्ण देशात ३५३ वी रँक आल्याने २०१३ साली भारतीय पोलीस सेवेत (आयपीएस) निवड झाल्याचे निखिल नंदकुमार पिंगळे सांगतात. महाराष्ट्र कॅडर त्यांना मिळाले असून त्यांनी आतापर्यंत गडचिरोली, गोंदिया, चंद्रपूर, वर्धा आणि पंढरपूर येथे उल्लेखनीय काम केले आहे. लातूर जिल्हा पोलीस अधीक्षक म्हणून ते सध्या कार्यरत आहेत.

निखिल पिंगळे हे मूळचे पुणे जिल्ह्यातील पाबळ गावचे. परंतु, त्यांचे बालपण आणि शालेय शिक्षण राजगुरुनगर येथे झाले. सहायक पोलीस आयुक्त या पदावरून त्यांच्या आई सेवानिवृत्त झाल्या आहेत. त्यामुळे पोलीस सेवेबद्दल आधीपासून त्यांना आकर्षण आणि माहिती होती. पुण्यातील एमआयटी कॉलेजमधून निखिल पिंगळे यांनी माहिती तंत्रज्ञान (आयटी) या विषयात प्रथम वर्गात पदवी प्राप्त केली आहे.

---

शालेय शिक्षण असो की महाविद्यालयीन किंवा स्पर्धा परीक्षेची तयारी असो. यापैकी कोणत्याही पातळीवर प्रत्येकाला एकदा तरी अपयश आलेलेच असते. त्या अपयशातून अनेकजण धडे घेऊन पुढे जातात. तर काही जण अपयशामुळे खचून जातात. मात्र, अपयश आले म्हणून वाईट वाटून घेण्यापेक्षा त्यातून शिकणे फार महत्त्वाचे असते. मी २०१२ साली यूपीएससीचा पहिला प्रयत्न दिला. त्यात अपयश आले. मात्र खचून न जाता मी या परीक्षेचे मागील काही वर्षांतील पेपर तपासले. त्यात कोणत्या विषयाला जास्त महत्त्व आहे, तर कोणत्या विषयाला कमी महत्त्व दिले आहे. हे प्रत्येक वर्षाचे पेपर तपासताना तुलना करून पाहिले. त्यातून मनातील सर्व शंका दूर झाल्या आणि पूर्ण फोकसने अभ्यासाला सुरुवात केली. त्यानंतर मित्रांबरोबर गटचर्चा आणि चांगल्या कोचिंग क्लासमधून मार्गदर्शन तसेच त्यांचे स्टडी मटेरियल वापरल्याचे पिंगळे सांगतात.

---

वैकल्पिक विषयाची तयारी/नोट्स

यूपीएससीच्या परीक्षेत सामान्य अध्ययन (जनरल स्टडीज) पेपर बरोबर वैकल्पिक विषय फार महत्त्वाचा असतो. या विषयात तुमचा आवाका तुम्ही वाढवला तर जास्तीत जास्त गुण मिळतात. त्यासाठी तुम्ही वैकल्पिक विषय निवडताना आपल्याला तो विषय किती आवडतो, किती समजतो आणि आपल्याला तो लिहिताना काय अडचणी येतात, याची एकदा खात्री करून पाहावे. त्यानंतर वाचन करताना नोट्स काढणे, लिखानाचा सातत्याने सराव करणे आवश्यक आहे.

----

नियमित टेस्ट सिरीज देणे

बऱ्याच वेळा अनेकांककडे भरपूर ज्ञान असते. प्रत्येक प्रश्नाचे उत्तर देखील असते. मात्र, परीक्षेपूर्वी लेखनाचा सराव केला नसल्याने संपूर्ण पेपर सोडवता येत नाही. त्यामुळे सर्व येत असतानाही वेळेअभावी पेपर सोडवता येत नाही. यूपीएससीच्या पूर्व, मुख्य परीक्षेपूर्वी नियमितपणे लेखनाचा सराव त्यामुळे अत्यंत आवश्यक आहे. त्यासाठी वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षेच्या तयारी करणाऱ्या कोचिंग क्लासमध्ये टेस्ट सिरीज लावावी. कारण टेस्ट सिरीज दिल्यानंतर तेथील मार्गदर्शक हे पेपर तपासून देताना काय चुकले, कशात आणखी सुधारणा करायची याबाबत मार्गदर्शन करतात. त्यातून आपली आणखी अचूकतेच्या दिशेने वाटचाल होते.

फोटो : निखिल पिंगळे

Web Title: A single ray of radiance

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.