एकेक किरण तेजाचा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2021 04:08 AM2021-07-15T04:08:29+5:302021-07-15T04:08:29+5:30

निष्ठा, समर्पण असेल तरच होईल यूपीएससीचे शिखर सर अभिजित कोळपे केंद्रीय लोकसेवा आयोगाची (यूपीएससी) म्हणजे लांब पल्ल्याची, सहनशक्तीची दीर्घकाळ ...

A single ray of radiance | एकेक किरण तेजाचा

एकेक किरण तेजाचा

Next

निष्ठा, समर्पण असेल तरच होईल यूपीएससीचे शिखर सर

अभिजित कोळपे

केंद्रीय लोकसेवा आयोगाची (यूपीएससी) म्हणजे लांब पल्ल्याची, सहनशक्तीची दीर्घकाळ चालणारी प्रक्रिया आहे. त्यात यशस्वी व्हायचे असेल तर निष्ठा, समर्पण हे अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यामुळे सातत्याने रोज अभ्यास करणे आणि हळूहळू गती वाढवत न्यावी लागते. तरच यूपीएससीचे शिखर सर करता येते, असा मोलाचा सल्ला केवळ दुसऱ्याच प्रयत्नात देशात ५४ वा क्रमांक मिळवलेले आणि सध्या कर्नाटक राज्यातील टुमकुर जिल्ह्यातील टिपचूरचे सहायक आयुक्त म्हणून कार्यभार पाहणारे दिग्विजय बोडके देतात.

दिग्विजय बोडके हे मूळचे नांदेड जिल्ह्यातील देगलूरचे. परंतु, त्यांचे संपूर्ण शिक्षण ठाणे शहरात झाले. तर पुण्यातील एमआयटी महाविद्यालयातून त्यांनी सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये पदवी मिळवली आहे. त्यांचे वडील हे आयएएस असून ते महाराष्ट्रात कार्यरत आहेत. त्यामुळे दिग्विजय यांना प्रशासकीय सेवेचे बाळकडू आणि पाठिंबा घरातूनच मिळाला आहे. सुरुवातीला त्यांनी दिल्ली येथे यूपीएससीचे सहा महिने प्रशिक्षण घेतले. त्यानंतर त्यांनी संपूर्ण तयारी घरूनच केली. पहिल्या प्रयत्नात यूपीएससीत यशस्वी होत भारतीय पोलीस सेवा (आयपीएस) पद मिळवले. तर महाराष्ट्र वनसेवा परीक्षेत राज्यात प्रथम येण्याचा मान मिळवला. मात्र, सुरुवातीपासून आयएएस होण्याचा निर्धार केल्याने आयपीएस पद न स्वीकारता आयएएससाठी प्रयत्न सुरू केले. केवळ दुसऱ्याच प्रयत्नात २०१८ साली संपूर्ण देशात ५४ रँक मिळवत आयएएस पद मिळवले.

दिग्विजय बोडके सांगतात की, तुम्ही किती तास अभ्यास करता यापेक्षा किती गुणात्मक करता हे जास्त महत्त्वाचे आहे. योग्य मार्गदर्शन घेत त्याप्रमाणे नियोजन आखून फोकस पद्धतीने, गुणात्मक अभ्यास यूपीएससी परीक्षेसाठी अत्यंत गरजेचा आहे.

National Council Educational Research Training म्हणजे NCERT ची पाचवी ते बारावीपर्यंतची पुस्तके यूपीएससीसाठी महत्त्वाची असून तो पाया आहे. तसेच मी पूर्व आणि मुख्य परीक्षेत कोणताही फरक न करता दोन्ही परीक्षांचा एकत्रित अभ्यास केला. अडचणी आल्यावर संदर्भ साहित्य, पुस्तके, मार्गदर्शक आणि गुगल-यू-ट्यूब वरून तपासून घेतले. (सोशल मीडियाचा वापर गरजेपुरताच केला. इतर वेळेस सोशल मीडियापासून दूर राहिलो.)

---

एका-एका विषयाचे १००-१०० पेपर सोडवले

यूपीएससी परीक्षेत लेखन सराव अत्यंत महत्त्वाचा आहे. बराच वेळा प्रश्नांची उत्तरे माहिती असून देखील लिहिताना वेळ पुरत नाही. त्यामुळे हातातील गुण मिळत नाही. त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्यांने लेखन सरावाकडे गांभीर्याने पाहावे. मी स्वतः वैकल्पिक भूगोल विषयाचे दोन आणि सामान्य अध्ययनचे चार पेपर तसेच निबंध या प्रत्येकाचे १००-१०० पेपर मी सोडवले. अनेकांना हे अशक्य वाटते. पण मी सुरुवातीपासून सातत्याने सराव केला. त्यामुळे मला यश मिळाले.

----

‘प्लॅन-बी’चा प्रत्येकाने विचार करावा

सध्याच्या घडीला विचार केल्यास यूपीएससी करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांने ‘प्लॅन-बी’चा विचार करायला हवा. कारण यूपीएससी दर वर्षी केवळ १००० च्या आसपास जागा भरते. मात्र, त्यासाठी संपूर्ण देशभरातून १५-१६ लाख विद्यार्थी अर्ज भरतात. त्यामुळे प्रचंड स्पर्धा वाढली आहे. तसेच यापुढे ती आणखी वाढत जाणार आहे. त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्यांने करिअरच्या दृष्टीने ‘प्लॅन-बी’चा विचार करणे आवश्यक आहे.

Web Title: A single ray of radiance

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.