एकेक किरण तेजाचा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2021 04:07 AM2021-07-22T04:07:53+5:302021-07-22T04:07:53+5:30

अभिजित कोळपे केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेची तयारी करताना अभ्यासक्रम, प्रश्नपत्रिका आणि अभ्यासाचे नियोजन करणे गरजेचे आहे. किमान मागील १०-१२ ...

A single ray of radiance | एकेक किरण तेजाचा

एकेक किरण तेजाचा

Next

अभिजित कोळपे

केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेची तयारी करताना अभ्यासक्रम, प्रश्नपत्रिका आणि अभ्यासाचे नियोजन करणे गरजेचे आहे. किमान मागील १०-१२ वर्षांतील आयोगाच्या प्रश्नप्रत्रिकांचे तुलनात्मक (ॲनॅलिसिस) आकलन करावे. त्याचबरोबर आयोगाच्या परीक्षेत यशस्वी झालेल्या आयएएस, आयपीएस, आयएफएस आणि आयआरएसची पदे मिळालेल्या विद्यार्थ्यांनी सोडवलेल्या उत्तरपत्रिकांचे आकलन करावे. त्याप्रमाणे आपण अभ्यासाचे नियोजन करून पेपर सोडवण्याचा सातत्याने सराव केल्यास यश मिळू शकते. त्याचबरोबर यूपीएससी परीक्षेत दिवसेंदिवस स्पर्धा वाढत आहे. त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्याने करिअरच्या दृष्टीने ‘प्लॅन-बी’चा विचार करावा, असा सल्ला संपूर्ण देशात सन २०१० साली २४४ वी रँक मिळवत भारतीय पोलीस सेवेत (आयपीएस) निवडलेले राजीव पांडे देतात. ते सध्या केंद्रशासित प्रदेश लडाख येथे विशेष पोलीस अधीक्षक म्हणून कार्यरत आहेत.

राजीव पांडे हे मूळचे उत्तर प्रदेश राज्यातील प्रतापगड जिल्ह्यातील आहेत. परंतु, त्यांचे शालेय शिक्षण महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग जिल्ह्यात तर, महाविद्यालयीन शिक्षण पुण्यात झाले. विशेष बाब म्हणजे त्यांची मातृभाषा हिंदी असतानाही त्यांनी ‘मराठी’ विषयात पदवी घेतली आहे. तसेच यूपीएससीच्या परीक्षेत त्यांनी मराठी हाच वैकल्पिक विषय घेऊन परीक्षा दिली आहे.

---

पूर्व परीक्षा असो अथवा मुख्य परीक्षा. परीक्षेची तयारी करताना आयोगाच्या मागील १०-१२ वर्षांतील प्रश्नपत्रिकांचा अभ्यास करणे गरजेचे आहे. त्यात प्रत्येक विषयात कोणत्या प्रश्नाला किती महत्त्व दिले जात आहे. याचा ट्रेंड लक्षात घ्यावा. त्यामुळे त्याप्रमाणे अभ्यासाची दिशा ठरवता येते. पूर्व आणि मुख्य परीक्षेत काही गोष्टी पाठांतराचा भाग असतो. त्या कोणत्या आहेत त्या लक्षात घेणे गरजेचे आहे. त्याचबरोबर यापूर्वी यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांनी सोडवलेल्या उत्तरपत्रिका मिळवाव्यात. त्या स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या अनेक क्लासमध्ये उपलब्ध केल्या जातात. त्या मिळवून त्यात यशस्वी विद्यार्थ्यांनी प्रत्येक प्रश्नाचे उत्तर कसे लिहिले आहेत. त्या प्रश्नाला किती गुण मिळाले आहेत. याचे सूक्ष्म पद्धतीने आकलन, निरीक्षण करणे अत्यंत गरजेचे आहे.

बऱ्याच वेळा विद्यार्थी त्याकडे फार गांभीर्याने पाहत नाहीत. त्यामुळे विद्यार्थ्यांचा परीक्षेबाबतचा फोकस बदलतो. त्यामुळे जे परीक्षेत विचारले जाणार नाही, अशा इतर घटकांचा विनाकरण अभ्यास करत राहतो. त्यात खूप वेळ जातो. त्यामुळे परीक्षेचा अभ्यासक्रम प्रत्येकाने व्यवस्थित समजून घेणे आवश्यक आहे. एखाद्या वेळेस आपल्याला तो समजला नाही, तर यशस्वी विद्यार्थी किंवा चांगल्या मार्गदर्शक शिक्षकांकडून समजून घ्यावे. त्याशिवाय अभ्यासाला सुरुवात करू नये. कारण, अभ्यासक्रम नक्की काय आहे, हेच जर समजले नाही तर विनाकारण भलत्याच विषयांचा तासंतास अभ्यास करण्यात वेळ वाया जातो. त्यामुळे या बाबी लक्षात घेऊन अभ्यास करावा. त्यासाठी एक वेळ क्लास नाही लावला तरी चालेल; पण योग्य मार्गदर्शन घ्यावे. मी स्वत: गरजेपुरताच क्लास लावला होता; पण यशस्वी विद्यार्थी अधिकाऱ्यांचा सल्ला तसेच क्लासमधील अनुभवी शिक्षकांकडून अडचण आल्यास सातत्याने मार्गदर्शन घेत घरूनच अभ्यास केला आहे.

२५० गुणांसाठी एका विषयावर निबंध लिहितानासुद्धा विशेष काळजी घ्यावी. कारण, निबंधातील गुण आपल्याला हमखास मिळू शकतात. त्यासाठी निंबधाचा विषय तसेच सुरुवात, मध्य आणि शेवट करताना व्यवस्थित करणे गरजेचे आहे. बरेच विद्यार्थी निबंध लिहिताना जसे आठवेल तसे लिहितात. त्यामुळे त्यात विस्कळीतपणा खूप येतो. पेपर तपासणाऱ्या शिक्षकांना निबंधाची मांडणी किचकट वाटली तर हातातील गुण जाऊ शकतात. त्यामुळे निबंधाच्या पेपरकडेदेखील गांभीर्याने पाहणे आवश्यक आहे.

फोटो : राजीव पांडे

Web Title: A single ray of radiance

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.