एकेक किरण तेजाचा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2021 04:12 AM2021-08-26T04:12:32+5:302021-08-26T04:12:32+5:30
अभिजित कोळपे केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेचा पॅटर्न बदलला आहे. चालू घडामोडींना (करंट इव्हेंन्टस) जास्त महत्त्व आले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी ...
अभिजित कोळपे
केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेचा पॅटर्न बदलला आहे. चालू घडामोडींना (करंट इव्हेंन्टस) जास्त महत्त्व आले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी प्रथम परीक्षेचा अभ्यासक्रम समजून घेणे आवश्यक आहे. विविध विषयांच्या घडामोडींची सातत्याने नोंद ठेवणे आवश्यक आहे. पुस्तके, मासिके, वर्तमानपत्रांचे वाचन करत असताना आता त्याचबरोबर आता इंटरनेटचा वापर करणे अत्यंत गरजेचे आहे. कारण अनेक क्लास ऑनलाइन माध्यमातून होत आहे. ते सर्व इंटनेटवर उपलब्ध आहे. त्याचा वापर करत विविध विषयांच्या घडामोडींच्या सातत्याने नोंदी ठेवाव्यात. परीक्षेमध्ये त्याचा खूपच फायदा होतो, असा सल्ला केंद्रीय वस्तू व सेवा कर विभागात पुणे येथे उपसंचालक पदावर कार्यरत असलेले डाॅ. मोतीलाल शेटे देतात.
यूपीएससीच्या परीक्षामध्ये दोनदा निवड झालेले आणि एमबीबीएस असलेले डॉ. मोतीलाल शेटे हे मूळचे कोल्हापूर जिल्ह्यातील वाठार तर्फे उदगाव येथील आहेत. सन २०१२ साली पहिल्यांदा भारतीय रेल्वे ट्रॅफिक सर्व्हिस (आयआरटीएस) मध्ये निवड झाली. त्यांनतर सन २०१४ मध्ये भारतीय आयकर विभागात (आयआरएस-वस्तू व सेवा कर) निवड झाली आहे. सुरुवातीचे दोन वर्षे औरंगाबाद येथे नेमणूक झाली होती. तर आता केंद्रीय वस्तू व सेवा कर विभागात पुणे येथे उपसंचालक म्हणून कार्यरत आहे. त्यांचे प्राथमिक आणि माध्यमिकचे शिक्षण मूळ गावी तसेच इस्लामपूर येथे झाले आहे. आई गृहिणी तर वडील स्टेट बॅंकेत नोकरीला होते. यूपीएससीच्या तयारीसाठी घरातून पाठिंबा होता. त्यामुळे अभ्यास करताना पूर्ण फोकसने अभ्यास केल्यामुळे लवकर यशस्वी झालो, असे डॉ. शेटे सांगतात.
परीक्षा काय प्रकारची आहे. हे समजून घेण्यासाठी सुरुवातीला मी खासगी क्लास लावला होता. त्यानंतर मी पूर्णत: वैयक्तिक घरूनच अभ्यास केला. चार-पाच मित्रांचा आमचा चांगला ग्रुप केला होता. वेगवेगळ्या विषयांवर आम्ही सातत्याने चर्चा करायचो. त्यामुळे अनेक अवघड विषय, संकल्पना (कन्सेप्ट) समजण्यासाठी किंवा लक्षात राहण्यासाठी गटचर्चा (ग्रुप स्टडी) अत्यंत फायदेशीर झाली आहे. एकएकट्याने अभ्यास करताना परीक्षेत काय विचारले जाते, काय वाचायला पाहिजे, यावरचा फोकस हलण्याची, बदलण्याची शक्यता बऱ्याच वेळा चुकत जाते. अनेक विद्यार्थी अनावश्यक असलेली पुस्तके वाचत बसतात. त्यात प्रचंड वेळ, वर्षे वाया जातात. त्यामुळे यूपीएससीच्या परीक्षेत नेमके काय विचारले जात आहे, हे समजणे आणि समजून घेणे फारच आवश्यक आहे.
डॉ. शेटे सांगतात, की पूर्व परीक्षा ही वैकल्पिक प्रकारची असल्याने त्यादृष्टीने नियमितपणे वर्तमानपत्र वाचन करत नोट्स काढणे आवश्यक आहे. परीक्षेच्या काळात या नोट्सचा खूप फायदा होतो. मुख्य परीक्षेची मांडणी ही विश्लेषणात्मक असल्याने लेखन सराव फार गरजेचा आहे. मुलाखतीची तयारी करताना सुरुवातीला दोन-तीन क्लासमध्ये मी मुलाखत दिली होती. मात्र, मित्रांबरोबर गटचर्चा करताना सातत्याने मुलाखतीचा सराव केला. मित्र वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न काढायचे. प्रत्येक मुलाखतीच्या वेळी सराव करताना मित्र अनेक त्रुटी काढायचे. त्यावर मग मी जाणीवपूर्वक सुधारणा केल्या. त्याचा यूपीएससीच्या अंतिम परीक्षेच्या वेळी खूप फायदा झाला आहे.
फोटो : डॉ. मोतीलाल शेटे