तेल्या भुत्याच्या कावडीने घाट सर
By Admin | Published: April 9, 2017 04:26 AM2017-04-09T04:26:42+5:302017-04-09T04:26:42+5:30
महाराष्ट्रातील अनादी सिद्ध व पुराणसिद्ध ऐतिहासिक भगवान शंकरांचे जागृत देवस्थान, दक्षिण भारताचे कैलास म्हणून ओळखले जाणारे श्रीक्षेत्र शिखर शिंगणापूर येथे खळद,
खळद : महाराष्ट्रातील अनादी सिद्ध व पुराणसिद्ध ऐतिहासिक भगवान शंकरांचे जागृत देवस्थान, दक्षिण भारताचे कैलास म्हणून ओळखले जाणारे श्रीक्षेत्र शिखर शिंगणापूर येथे खळद, खानवडी, एखतपूर, मुजवडी, कुंभारवळण या पंचक्रोशीच्या संत तेल्या भुत्याच्या कावडीने आज मुंगी घाट सर केला.
सर्व भाविकांनी चैत्र शुद्ध द्वादशीला ‘हर हर महादेवा’च्या जयघोषात, शिवभक्तीच्या प्रेरणेने बिगरदोराने केवळ मानवी साखळीच्या साह्याने अवघड असा मुंगी घाट सर करीत पायी वारीने आणलेल्या कऱ्हेच्या पवित्र जलाने निवृत्तीमहाराज खळदकर यांच्या हस्ते स्वयंभू ‘श्रीं’ना धार घातली.
तेल्या भुत्याची कावड रणखिळा येथे पोहोचली. या वेळी कावडीसोबत पायी वारीत न आलेले पंचक्रोशीतील हजारो भाविकही येथे दाखल झाले.
दुपारी तीनच्या दरम्यान ढोलताशा, लेझीम, वाजंत्री यांच्या गजरात, फटाक्याच्या आतषबाजीत भव्य मिरवणुकीने कावडीने मुंगी घाटाच्या दिशेने प्रयाण केले. सायंकाळी पाचपर्यंत कावड मुंगी घाट पायथ्याला आली. तेथे महाआरती करून शंभोच्या नावाचा महागजर झाला व भक्तिमय वातावरण कावडीची अवघड अशी मुंगी घाटाची चढण सुरू झाली. वाजंत्र्यांच्या, डफडीच्या ठेक्यावर बिगरदोराने केवळ मानवी साखळीच्या साह्याने होणारी कावडीची चढण हा सोहळा डोळ्यांचे पारणे फेडणारा होता. लाखो भाविक डोंगरमाथ्यावर गर्दी करून बसले होते.
या वेळी घाटमाथ्यावर साताऱ्याचे पालकमंत्री विजय शिवतारे, पुणे जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष संजय जगताप, नीरा बाजार समिती माजी सभापती बाळासाहेब कामथे, जि.प. सदस्य दत्ता झुरंगे, दिलीप यादव, मुख्य कार्यकारी अधिकारी राजेश देशमुख, पोलीस उपविभागीय अधिकारी यशवंत काळे, सहायक पोलीस निरीक्षक युवराज हांडे, दहिवडी प्रांत दादासो कांबळे, फलटण प्रांत राजेश चव्हाण, शंभूमहाराज भांडारगृह मठ संस्थानाचे मठाधिपती सिद्धलिंग शिवाचार्य महाराज आदी
उपस्थित होते.
१० एप्रिल रोजी कावड गुप्तलिंगाचे दर्शन घेऊन परतीच्या प्रवासाला निघेल व १३ एप्रिलला पंचक्रोशीत खानवडी मुक्कामाला येईल व नंतर खानवडी, कुंभारवळण, मुंजवडी, एखतपूर, खळद अशा पंचक्रोशीच्या यात्रा सुरू होतील.