डेक्कन, प्रगती एक्स्प्रेस आठ दिवस बंद राहणार; कोयना, सह्याद्रीही मुंबईपर्यंत नाही येणार
By ऑनलाइन लोकमत | Published: July 24, 2019 01:14 PM2019-07-24T13:14:35+5:302019-07-24T15:18:55+5:30
पुणे-मुंबई रेल्वे मार्गावरील वाहतूक ही तांत्रिक दुरुस्ती व अन्य कामांसाठी 26 जुलै ते 9 ऑगस्ट दरम्यान बंद राहणार आहे.
पुणे - पुणे-मुंबईरेल्वे मार्गावरील वाहतूक ही तांत्रिक दुरुस्ती व अन्य कामांसाठी 26 जुलै ते 9 ऑगस्ट दरम्यान बंद राहणार आहे. पुण्याहून मुंबईला येणाऱ्या डेक्कन व प्रगती एक्स्प्रेस या गाड्या तब्बल आठ दिवस बंद ठेवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, लोणावळा ते कर्जतदरम्यान दुरुस्तीचे काम हाती घेतले जाणार आहे. या काळात कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी खबरदारी म्हणून वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे.
पुणे-मुंबई रेल्वे मार्गावरील वाहतूक बंद असल्याने या काळात काही ट्रेनचे मार्ग हे बदलण्यात आले आहेत. कोयना, सह्यादी, महालक्ष्मी एक्स्प्रेस या मुंबईहून सुटतात मात्र या कालावधी दरम्यान त्या पुण्याहून सुटणार आहेत. पुणे-पनवेल-पुणे शटल सेवा रद्द करण्यात आली आहे. तसेच पुणे-भुसावळ ट्रेन ही मनमाड मार्गे धावणार आहे. प्रवाशांनी 26 जुलै ते 9 ऑगस्ट दरम्यान पर्यायी मार्गाचा वापर करावा असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
पुणे-मुंबई रेल्वेमार्ग 26 जुलै ते 9 ऑगस्टपर्यंत बंद राहणार, दुरुस्तीसाठी रेल्वे मार्ग बंद राहणार #Pune
— Lokmat (@MiLOKMAT) July 24, 2019
कोयना, सह्याद्री आणि हुबळी-मुंबई एक्स्प्रेस शुक्रवार (26 जुलै) ते 9 ऑगस्ट या कालावधीत केवळ पुण्यापर्यंतच धावणार आहेत. घाटक्षेत्रात काम सुरू असल्याने मध्य रेल्वेने या एक्सप्रेसबाबत निर्णय घेतला आहे. कोयना आणि सह्याद्री एक्सप्रेस मिरज-सातारा-पुणे यामार्गे मुंबईला जाते. हुबळी-मुंबई एक्सप्रेसचा बेळगाव-मिरज-सातारा-पुणे आणि मुंबई असा मार्ग आहे. मात्र, आता मध्य रेल्वेने या एक्सप्रेस 9 ऑगस्टपर्यंत केवळ पुण्यापर्यंत नेण्याचा आणि तेथून या मार्गावर पुन्हा सोडण्याचा निर्णय घेतला आहे. त्याबाबतची कार्यवाही रेल्वे विभागाकडून शुक्रवारपासून केली जाणार आहे. पुणे-मुंबई मार्गावरील घाटाच्या क्षेत्रात काही काम करावयाचे असल्याने रेल्वे विभागाने पुण्यापर्यंत संबंधित एक्सप्रेस सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला असल्याची शक्यता पुणे विभागीय रेल्वे सल्लागार समितीचे सदस्य शिवनाथ बियाणी यांनी व्यक्त केली आहे.