लॉकडाऊनमध्ये संभाजी पुलावरून दिसणारा किल्ले सिंहगड अनलॉकनंतर झाला 'गायब'! जाणून घ्या कारण..
By ऑनलाइन लोकमत | Published: November 3, 2020 11:29 AM2020-11-03T11:29:00+5:302020-11-03T11:54:47+5:30
लॉकडाऊनमध्ये एस. एम. जोशी पुलावरून किल्ले सिहंगड स्पष्ट दिसून येत होता. पण आता अनलॉकनंतर तो दिसेनासा झाला आहे.
श्रीकिशन काळे
पुणे : शहरात वाहनांची संख्या प्रचंड झाल्याने त्यातून निघणाऱ्या धुराने हवेतील पीएम २.५ धुलिकणांचे प्रमाण वाढले आहे. लॉकडाऊनमध्ये एस. एम. जोशी पुलावरून किल्ले सिहंगड स्पष्ट दिसून येत होता. पण आता अनलॉक नंतर तो दिसेनासा झाला आहे. त्यामुळे प्रदूषण कमी करण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. अन्यथा भविष्यात ही स्थिती अजून गंभीर होणार आहे. गेल्या आठवड्यात पीएम २.५ ची पातळी १४२ वर गेली होती, जी आरोग्यासाठी धोकादायक आहे.
शहरात वाहनांची संख्या वाढत आहे. या दसऱ्याला काही हजार वाहने रस्त्यावर आली. त्यातून निघणाऱ्या धुराने प्रदूषणात भर घातली आहे. त्यामुळे दररोजच्या प्रदूषणाची पातळी शंभरच्या आसपास जात आहे. परिणाम हे आरोग्यासाठी घातक ठरणारे आहे.
प्रदूषण कमी करायचे असेल, तर नागरिकांनी सायकलचा वापर अधिक करायला हवा. जवळच्या ठिकाणी चालत जावे. दुचाकीपेक्षा सायकल वापरल्यास आरोग्य देखील चांगले राहण्यासाठी मदत मिळते. तसेच इंधनाचा खर्चही वाचतो.
प्रदूषणाचा शरीरावर काय परिणाम?
एरवी शहरात शुद्ध हवा मिळत नाही. त्यासोबत कार्बन डायऑक्साइड, धुलिकण, बॅक्टेरिया, विषाणू, विविध परागकण आपण श्वासाद्वारे शरीरात घेत असतो. जे आपल्या शरीराला हानी पोचवतात. यामुळे हृदयावर परिणाम होऊन हायपरटेंशन, हृदयाचे आजार, हृदय बंद पडणे असा धोका असतो. फुप्फुसांना इन्फेक्शन, विसराळूपणा, अस्थमा, फुप्फुसाचा कॅन्सर, स्ट्रोक, अल्झायमर असे आजार होऊ शकतात.
सध्या थंडी सुरू झाल्याने हवेतील बारीक धुलीकण बराच काळ हवेतच राहतात. ते आपल्या आरोग्याला घातक ठरतात. श्वास घेताना ते आपल्या फुप्फुसात जाऊन आजार होण्याची शक्यता असते. त्यासाठी आता प्रत्येकाने मास्क घालणे बंधनकारकच झाले आहे.
- डॅा. संदीप साळवी, फुप्फुसरोग तज्ज्ञ
लॉकडाऊनपूर्वी - लॉकडाऊन सुरू - लॉकडाऊन- अन लॉकनंतर
१८ मार्च १९ मार्च ८ जून ३१ ऑक्टोबर
शिवाजीनगर १४० ७९ ५५ १४२
हडपसर १२६ ९२ ५८ १०८
पाषाण ६१ ४३ ५६ ५१
लोहगाव ११० ८० १०२ ८५
भोसरी १२३ ९२ ४० १०५
पीएम २.५ हवेची गुणवत्ता पातळी
०१ ते ५० पर्यंत शुध्द हवा,
५० ते १०० किंचित धोका,
१०० ते २०० धोकादायक हवा,
२०० ते ३०० खूप धोका