सिंहगड घाटात दरड कोसळली, पहाटेची घटना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 9, 2018 02:31 AM2018-07-09T02:31:28+5:302018-07-09T02:31:44+5:30
सिंहगड घाट रस्त्यावर रविवारी पहाटे उंबरदांड दरड पॉइंटवर मोठी दरड कोसळली. त्यामुळे गडावर जाणारा रस्ता बंद करण्यात आला असून राडारोडा बाजूला करण्याचे काम युद्धपातळीवर हाती घेण्यात आले.
पुणे/खडकवासला : सिंहगड घाट रस्त्यावर रविवारी पहाटे उंबरदांड दरड पॉइंटवर मोठी दरड कोसळली. त्यामुळे गडावर जाणारा रस्ता बंद करण्यात आला असून राडारोडा बाजूला करण्याचे काम युद्धपातळीवर हाती घेण्यात आले़ रविवारी सिंहगडावर जाणाऱ्यांंची गर्दी असते़ परंतु, दरड कोसळल्याने रस्ता बंद करण्यात आल्याने पर्यटकांची निराशा झाली.
सिंहगड घाट रस्त्यावर पायथ्यापासून आठ किलोमीटरवर उंबरदांड दरड पॉइंट आहे. तेथून वर गड एक किलोमीटर राहतो. गेल्या पाच दिवसांपासून सिंहगड परिसरात जोरदार पाऊस चालू असल्याने दरड कोसळली. पहाटे वाहतूक नसल्यामुळे कोणतीही दुर्घटना घडली नाही. पहाटे ४ वाजता गडावरील व्यावसायिक पंडित यादव गडावर जातात. दरड कोसळल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी त्वरित वनविभागास कळवले.
वन विभागाचे वनसंरक्षक बाळासाहेब जिवडे यांनी घटना स्थळाची पाहणी करून पोलीस आणि महसूल विभागास कळविले. वन विभागाने सिंहगड घाट रस्ता पर्यटकांसाठी सुरक्षेच्या कारणास्तव बंद केल्याचे पहाटे ५ वाजता जाहीर केले.
दरम्यान, घेरा सिंहगड वनसंरक्षण समितीचे अध्यक्ष सुरेश पायगुडे व कैलास जेधे यांनी त्वरित पाहणी करून राडारोडा हटवण्यास सुरुवात केली. त्यासाठी जेसीबी आणि दोन डंपरच्या साह्याने काम सुरू करण्यात आले आहे. हवेली पोलीस ठाण्याच्या सहायक पोलीस निरीक्षक स्वाती पाटील व त्यांच्या सहकाºयांनी घटनास्थळाची पाहणी केली. रविवारच्या सुट्टीमुळे पर्यटकांची होणारी गर्दी लक्षात घेऊन सिंहगड रस्त्याच्या पायथ्याशी पोलिसांकडून बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
जीवितहानी टळली
सुदैवाने यंदा हा प्रकार पहाटे घडल्याने कोणतीही जिवितहानी अथवा कोणी अडकून पडले नाही़ सायंकाळपर्यंत एखादे वाहन जाईल इतक्या रस्त्यावरील राडारोडा हटविण्यात आला आहे़ तरीही सुरक्षेच्या कारणास्तव रस्ता बंद ठेवण्यात आला असल्याचे वन विभागाने सांगितले़ रविवारी त्यात पावसाळ्याचे दिवस असल्याने हजारो पर्यटक सिंहगडावर येत असतात़ त्यांची चांगलीच निराशा झाली़