सिंहगड घाट रस्ता अनिश्चित काळासाठी बंद
By ऑनलाइन लोकमत | Published: July 31, 2017 07:41 PM2017-07-31T19:41:41+5:302017-07-31T19:42:53+5:30
सिंहगडावर जाणाऱ्या घाटात रविवारी सायंकाळी चारच्या सुमारास दरड कोसळण्याची घटना घडली. या घटनेच्या पार्श्वभूमीवर धोकादायक दरडी काढण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे पुढील किमान आठ दिवस सिंहगड पर्यटकांसाठी बंद ठेवण्यात आला आहे.
पुणे, दि. ३१ - सिंहगडावर जाणाऱ्या घाटात रविवारी सायंकाळी चारच्या सुमारास दरड कोसळण्याची घटना घडली. सुदैवाने सुरक्षारक्षकांनी दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे मोठी हानी टळली. या घटनेच्या पार्श्वभूमीवर धोकादायक दरडी काढण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे पुढील किमान आठ दिवस सिंहगड पर्यटकांसाठी बंद ठेवण्यात आला आहे.
रविवारी सुट्टीचा दिवस असल्यामुळे सिंहगडावर पर्यटकांची मोठी गर्दी झाली होती. सायंकाळी गडावर जाणाऱ्या रस्त्यावर काही ठिकाणी दगड घसरत असल्याचे सुरक्षारक्षकांच्या निदर्शनास आले. त्यामुळे त्यांनी तातडीने गडावर जाणारी व गडावरून येणारी वाहतूक अडवली. त्यामुळे मोठी हानी टळली.
दरड काढण्याचे काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आले होते. तोपर्यंत पर्यटकांना गडावरच थांबण्याचा इशारा प्रशासनाने दिला होता. दरम्यान रात्री उशिरा दगडांचा ढिगारा बाजूला केल्यानंतर सर्व पर्यटक सुरक्षित खाली उतरले. आज धोकादायक दरडी काढण्याचे काम सुरू करण्यात आले असून पुढील काही दिवस सिंहगड पर्यटकांसाठी बंद ठेवण्यात आला आहे.