सिंहगड घाट रस्ता पर्यटकांसाठी पुन्हा सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 2, 2018 09:32 PM2018-08-02T21:32:43+5:302018-08-02T21:33:12+5:30
जुलै महिन्यात सुरू झालेल्या जोरदार पावसामुळे सिंहगड घाट रस्त्यातील उंबरडांड दरड पॉईंटवर एक आठवड्यात दोन वेळा मोठी दरड कोसळली होती.
खडकवासला: दरड कोसळल्यामुळे बंद असलेला सिंहगड घाट रस्ता उद्यापासून पर्यटकांसाठी सुरू करण्यात येणार आहे. दरड कोसळल्यापासून गेल्या महिनाभर सुरक्षिततेच्या कारणास्तव घाटरस्ता बंद करण्यात आला होता.जुलै महिन्यात सुरू झालेल्या जोरदार पावसामुळे सिंहगड घाट रस्त्यातील उंबरडांड दरड पॉईंटवर एक आठवड्यात दोन वेळा मोठी दरड कोसळली होती. दोन्ही वेळेस पहाटेच्या सुमारास झालेल्या या घटनेमुळे कोणतीही जीवितहानी झाली नव्हती हा केवळ योगायोग म्हणावा लागेल.
सिंहगडावरील वाहन तळापासून खाली एक किलोमीटर अंतरावर कोसळलेल्या दरडीच्या मलावातील दगड गोटे व राडारोड्यामुळे संपुर्ण रस्ता व्यापला होता. पर्यटकांना मार्गदर्शन करण्यासाठी घाटरस्त्यावरील धोकादायक ठिकाणी वनसंरक्षण समितीचे कर्मचारी तैनात करण्यात येणार असल्याचे सहाय्यक वन संरक्षक महेश भावसार यांना सांगितले . ते पुढे असे म्हणाले, दरड परिसरातील सर्व राडारोडा काढून रस्ता करण्यात आला आहे. पर्यटकांची सुरक्षितता विचारात घेऊन आवश्यक उपाययोजना करण्यात आल्या आहेत. तसेच संस्थेच्या माध्यमातून घाटरस्त्याची पाहणी करण्याचे विचाराधीन आहे.