सिंहगड पोलिसांनी वडगाव बुद्रुक येथे केले आठ लाखांचे मेफेड्रॉन जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2020 16:37 IST2020-12-31T16:37:38+5:302020-12-31T16:37:55+5:30
सिंहगड रस्ता पोलिसांत गुन्हा दाखल; एकाला अटक

सिंहगड पोलिसांनी वडगाव बुद्रुक येथे केले आठ लाखांचे मेफेड्रॉन जप्त
धायरी: सरत्या वर्षाला निरोप देत नवीन वर्षाचे स्वागत दरवर्षी तरुणाई मोठ्या उत्साहात करताना बघावयास मिळते. यंदा मात्र कोरोनाचे सावट असल्याने तसेच पुणे शहर पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी अंमली पदार्थ विरोधी विशेष मोहीम उघडली आहे. त्या अनुषंगाने सिंहगड रस्ता पोलिसांनी एका व्यक्तीला ताब्यात घेऊन त्याच्याकडून ८ लाख ८ हजार चारशे रुपयांचा ऐवज जप्त केला आहे. मोहम्मद अब्दुल रेहमान इरशाक ( वय : २३, मुंढवा, पुणे मूळ रा.केरळ) याच्याविरुद्ध सिंहगड रस्ता पोलिसांनी गुन्हा दाखल करून त्यास ताब्यात घेतले आहे.
सिंहगड रस्ता पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस कर्मचारी किशोर शिंदे व धनाजी धोत्रे यांना मिळालेल्या बातमी वरून वडगांव बुद्रुक येथील भन्साळी कॅम्पस सोसायटीसमोर एक व्यक्ती अंमली पदार्थ विक्री करण्यासाठी मोपेड गाडीवर बसलेला असल्याचे समजले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक देविदास घेवारे यांना माहिती मिळताच त्यांनी तातडीने त्या व्यक्तीस ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याच्याजवळ ६३ ग्रॅम वजनाचे मेफेड्रॉन ( एम डी) अंमली पदार्थ बेकायदेशीररित्या जवळ बाळगताना आढळून आल्याने त्याला ताब्यात घेऊन अटक केली आहे.
ही कामगिरी अप्पर पोलीस आयुक्त डॉ. संजय शिंदे, पोलीस उपायुक्त पौर्णिमा गायकवाड,सहायक पोलिस आयुक्त पोमाजी राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली सिंहगड रस्ता पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस देविदास घेवारे,गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रमोद वाघमारे, सहायक पोलीस निरीक्षक चेतन थोरबोले, पोलीस उपनिरीक्षक कुलदीप संकपाळ, अविनाश शिंदे, पोलीस कर्मचारीमोहन भुरुक, आबा उत्तेकर,राजेश गोसावी यांच्या पथकाने केली आहे.