सिंहगड पुन्हा गजबजला; घाट रस्त्यातील दरडप्रवण भागातील जाळ्या बसवण्याचे काम पूर्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 6, 2017 12:21 PM2017-11-06T12:21:02+5:302017-11-06T12:25:48+5:30
३० जुलै रोजी दरड कोसळल्याने हा रस्ता सुरक्षिततेच्या कारणास्तव बंद करण्यात आला होता. आता पर्यटकांना गडावर गुलाबी थंडीतील पर्यटनाचा आनंद अनुभवता येणार आहे.
खडकवासला : सिंहगड घाट रस्त्यातील दरडप्रवण भागातील जाळ्या बसवण्याचे काम पूर्ण झाल्यामुळे पर्यटकांसाठी खुला करण्यात आला. ३० जुलै रोजी दरड कोसळल्याने हा रस्ता सुरक्षिततेच्या कारणास्तव बंद करण्यात आला होता. आता पर्यटकांना गडावर गुलाबी थंडीतील पर्यटनाचा आनंद अनुभवता येणार आहे.
जोरदार पावसामुळे सिंहगड घाट रस्त्यातील दरडप्रवण भागातील दोन तीन वेळा दरडी कोसळल्या होत्या. परंतु ३० जुलै रोजी कोसळलेली दरड प्रशासनासह सर्वांची थरकाप उडवणारी होती. केवळ वनसुरक्षारक्षकांच्या प्रसंगावधानाने कोणतीही जीवितहानी झाली
नव्हती. परंतु हजारो पर्यटक गडावर अडकले होते.
दरड कोसळल्याने जिल्हाधिकार्यांच्या आदेशानुसार पर्यटकांना घाट रस्ता बंद करून सार्वजनिक बांधकाम विभागाने दरडप्रवण भागातील धोकादायक वळणांवरील दरडींना आणि दगडांना जाळ्या बसवण्याचे काम चालू होते. त्यामुळे गेल्या तीन महिन्यांपासून बंद असलेल्या या रस्त्याने दिवाळीच्या सुटीतही गडावर जाता आले नाही. तथापि, जाळ्या बसवण्याचे काम अंतिम टप्प्यात आल्यामुळे वन विभागाच्या वतीने शनिवारी घाट रस्ता पर्यटकांसाठी सुरू खुला करण्याचा निर्णय घेण्यात आला.
तीन महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर सिंहगड घाट रस्ता सुरू झाला. शनिवार आणि रविवारी सात हजारांपेक्षा जास्त पर्यटकांनी भेट दिली.
वन संरक्षण समितीला दोन दिवसांत ५३ हजार रुपये महसूल मिळाला. १४८४ दुचाकी आणि ४७५ चारचाकी गडावर गेल्या.
सिंहगड घाट रस्ता तात्पुरत्या स्वरूपात पर्यटकांसाठी चालू केला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाचे काम अंतिम टप्प्यात आले असून जाळ्यांअभावी थांबले आहे. त्यांच्या जाळ्या आल्यावर रस्ता काही दिवसांसाठी बंद करून जाळ्या बसवण्याचे काम करण्यात येणार आहे. रस्त्यावर पावसामुळे खड्डे पडून उखडलेला असला तरी या रस्त्यासाठी निधी मंजूर असूनही कामाचे नियोजन झालेले नाही. या कामाचे नियोजन झाल्यावर घाट रस्ता बंद करण्यात येणार आहे.
- हेमंत मोरे, वनपरिमंडळ अधिकारी, खानापूर