चार वाहनचोरांस अटक; १५ लाखांचा मुद्देमाल जप्त, सिंहगड रस्ता पोलिसांची कामगिरी
By ऑनलाइन लोकमत | Published: March 9, 2021 11:27 PM2021-03-09T23:27:05+5:302021-03-09T23:28:30+5:30
सिंहगड रस्ता पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २८ फेब्रुवारी रोजी नवले पुलाजवळ टाटा कंपनीचा उभा असलेला ट्रक मालासह चोरीस गेला असल्याची तक्रार चंद्रकांत गुजराथी (वय:५९, सदाशिव पेठ, पुणे) यांनी सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात दिली होती.
धायरी - ट्रकमधील मालासह दोन वाहने चोरी करणाऱ्या चार वाहनचोरांस सिंहगड रस्ता पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून तब्बल १५ लाख २१ हजार ३५९ रुपयांचा माल हस्तगत करण्यात आला आहे. रविंद्र अंकुश लष्करे (वय: २६, संभाजी नगर, बेनकरवस्ती, धायरी, पुणे), शंकर बाळू ढेबे (वय:२२), सोमनाथ चंद्रकांत नरळे (वय:२५) आणि भरत रमेश वाघ (वय: ३०) हे राहणार सदाशिव नगर, बारंगळी मळा, धायरी, पुणे या चार वाहनचोरांना सिंहगड रस्ता पोलिसांनी अटक केली आहे.
सिंहगड रस्ता पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २८ फेब्रुवारी रोजी नवले पुलाजवळ टाटा कंपनीचा उभा असलेला ट्रक मालासह चोरीस गेला असल्याची तक्रार चंद्रकांत गुजराथी (वय:५९, सदाशिव पेठ, पुणे) यांनी सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात दिली होती. याबाबत सिंहगड रस्ता पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी यांनी परिसरातील सीसीटिव्ही तपासले असता फुटेजच्या आधारे पोलीस शिपाई धनाजी धोत्रे व योगेश झेंडे यांना ट्रक चोरी करणारे धायरी भागात राहत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार त्यांनी एकास ताब्यात घेऊन चौकशी केली असता यापूर्वीही त्यांनी एक छोटा हत्ती वाहन व एक दुचाकी चोरले असल्याचे निष्पन्न झाले.
पोलिसांनी चार आरोपींना ताब्यात घेऊन एक ट्रक मालासह, एक छोटा हत्ती वाहन, एक दुचाकी असा एकूण १५ लाख २१ हजार ३५९ रुपयांचा माल हस्तगत केला आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक देवीदास घेवारे, यांच्या पथकाने ही कारवाई केली.
ट्रक चोरून नेला ताम्हिणी घाटात... -
बंद अवस्थेत उभा असलेला ट्रक चोरांनी नवले पुलाखालून चालवीत ताम्हिणी घाटात नेला. ट्रक मध्ये स्टिलचा ८ लाख रुपये किंमतीचा माल असल्याने चोरांनी तेथील एका व्यापाऱ्याशी संपर्क केला. मात्र व्यवहार न झाल्याने त्यातील एकाच्या गावी तो माल उतरवून ट्रक दूरवर नेऊन त्यांनी ट्रकची चाके काढली होती. मात्र सीसीटिव्ही फुटेजमुळे चोरटे अलगद पोलिसांच्या जाळ्यात सापडले.