मैत्रीच्या बहाण्याने ५ लाख रुपये किमतीचा ऐवज लंपास करणाऱ्या भामट्यास सिंहगड पोलिसांकडून अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: December 23, 2020 05:57 PM2020-12-23T17:57:41+5:302020-12-23T18:01:28+5:30
सिंहगड रस्ता पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी अक्षय धावडे यांची क्रिकेट खेळताना ऋषिकेश नावाच्या तरुणाशी ओळख झाली होती
धायरी: क्रिकेट खेळताना झालेल्या ओळखीतून मैत्रीचे नाते तयार करून एका भामट्याने मित्रालाच गंडा घातल्याचा प्रकार सिंहगड रस्ता पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडला आहे. ऋषिकेश मोहन बोंबले (वय: २८ वर्षे. रा. खेड, मंचर, जि. पुणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबत अक्षय काळुराम घावडे यांनी सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
सिंहगड रस्ता पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी अक्षय धावडे यांची क्रिकेट खेळताना ऋषिकेश नावाच्या तरुणाशी ओळख झाली होती. त्याने हळुहळु ओळख वाढवुन मैत्री केली. जवळची मैत्री झाल्याने ऋषिकेशने जॉब व राहण्याचा प्रॉब्लेम असल्याचे अक्षयला सांगितले. नव्याने झालेला मित्र अडचणीत आहे हे पाहुन त्याने ऋषिकेशला मित्राची रुम राहण्यास दिली. तसेच स्मार्ट फोन व होंडा दुचाकी वापरण्यास दिली. दोघेही नाश्ता करत असताना ऋषिकेशने गर्लफ्रेन्डवर इम्प्रेशन मारण्यासाठी अक्षयची १५ तोळ्याची सोन्याची चैन मागुन घेवुन गळ्यात घातली.
नाश्ता करुन झाल्यावर ऋषिकेशने माझा मित्र येणार आहे, जरा तिकडे बघ असे फिर्यादीस सांगून त्यांचे लक्ष विचलित करुन मोबाईल फोन, होंडा दुचाकी व १५ तोळ्याची सोन्याची चैन असा एकूण पाच लाखांचा मुद्देमाल घेवुन फसवणुक करुन पसार झाला होता. याबाबत १६ डिसेंबर रोजी अक्षय धावडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्ह्याचा तपास करीत असताना आरोपी ऋषिकेश हा आपली राहण्याची ठिकाणे सारखे बदलत होता. त्याचा शोध घेत असताना तांत्रिक तपासाच्या मदतीने मिळालेल्या माहीतीवरुन आरोपीस ताब्यात घेवुन सिंहगड रस्ता पोलिसांनी अटक केली आहे.
तपासांमध्ये आरोपी ऋषिकेशकडुन होडा दुचाकी व स्मार्ट फोन जप्त केले आहेत. तसेच १५ तोळ्याची चैन ही एका नामांकित फायनान्स कंपनीत गहाण ठेवुन ४ लाख ६० हजार रुपयांचे कर्ज घेतल्याचे निष्पन्न झाले आहे.चैन फायनान्स कंपनीकडुन हस्तगत करण्याची प्रक्रिया सुरु असुन अधिक तपास सुरु आहे. सदरचा आरोपी हा सराईत गुन्हेगार असून यापूर्वी देखील त्याचेवर चंदननगर पोलीस स्टेशन व चिखली पोलीस स्टेशन येथे अशाच प्रकारचे गुन्हे दाखल आहेत. नागरीकांनी अनोळखी इसमांशी मैत्री व मदत करताना योग्य ती खबरदारी घ्यावी व फायनान्स कंपनीने ग्राहकांना कर्ज देताना योग्य त्या कागदपत्रांची पडताळणी करावी, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
सदरची कामगिरी अपर पोलीस आयुक्त डॉ. संजय शिंदे, पोलीस उप-आयुक्त पोर्णिमा गायकवाड, सहायक पोलीस आयुक्त पी. डी. राठोड, सिंहगड रस्ता पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक देवीदास घेवारे, पोलीस निरीक्षक ( गुन्हे) प्रमोद वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक चेतन थोरबोले, पोलीस उपनिरीक्षक कुलदीप संकपाळ, पोलीस कर्मचारी राजेश गोसावी, किशोर शिंदे, दयानंद तेलंगे - पाटील, अविनाश कोंडे, रफिक नदाफ यांच्या पथकाने केली आहे.