Pune Traffic : अवघ्या मिनीटभराचे अंतर पार करायला लागताे अर्धातास

By राजू इनामदार | Updated: November 30, 2024 12:03 IST2024-11-30T12:00:21+5:302024-11-30T12:03:57+5:30

सिंहगड रस्त्यावरील चित्र : दुरवस्थेचा कहर, महापालिका ठेकेदार, वाहतूक शाखा सर्वांचेच दुर्लक्ष

sinhagad road traffic It takes half an hour to cover the distance of just one minute | Pune Traffic : अवघ्या मिनीटभराचे अंतर पार करायला लागताे अर्धातास

Pune Traffic : अवघ्या मिनीटभराचे अंतर पार करायला लागताे अर्धातास

पुणे : दररोज लाखभर प्रवाशांची ये-जा होत असलेल्या सिंहगड रस्त्याला सध्या कोणीही वाली उरलेला नाही, अशी तीव्र भावना या भागातील नागरिकांची झाली आहे. उड्डाणपुलाचे काम सुरू आहे, या नावाखाली मागील ३ वर्षे या रस्त्यावरून ये-जा करणारे वाहनधारक शब्दशः मरणयातना भोगत आहेत. महापालिका, उड्डाणपुलाची ठेकेदार कंपनी, वाहतूक शाखा अशा सर्वच यंत्रणांनी त्याला वाऱ्यावर सोडले आहे.

राजाराम पूल चौकापासून ते थेट धायरी फाट्यापर्यंत साधारण २ किलोमीटर अंतराचा हा रस्ता म्हणजे लहानमोठ्या अपघातांचे आगार झाला आहे. सकाळी ९ ते ११ ही कार्यालयामध्ये जायची व सायंकाळी ५ ते रात्री ९ ही कार्यालयातून परत यायची वेळ. यात वाहनधारकांसाठी जीवघेणी कसरत झाली आहे. या पिकटाइममध्ये अवघ्या मिनिटभराचे अंतर पार करायला अर्ध्या तासापेक्षा जास्त वेळ जातो. इतरवेळीही हा रस्ता पार करणे म्हणजे अडथळ्यांची शर्यतच आहे.

उड्डाणपुलाच्या कामामुळे हा रस्ता एकसंध असा राहिलेलाच नाही. अनेक ठिकाणी ते उंच सखल झाला आहे. कितेक ठिकाणी तर तो उखडला आहे. तो काही ठिकाणी काँक्रिटचा आहे, काही ठिकाणी डांबरी आहे तर काही ठिकाणी त्यावर सिमेंट काँक्रिटचे पेवर ब्लॉक बसवलेले आहे. जवळपास सगळीकडेच ताे उखडलेला आहे. त्यामुळे येथे खड्डे चुकवतच वाहन चालवावे लागते. विशेष म्हणजे काँक्रिट व डांबरी अशा एकत्र झालेल्या भागावर मध्यभागी मोठ्या भेगा पडल्या आहेत. त्यातून वाहन गेले की लगेचच घसरते किंवा शेजारीच असलेल्या वाहनाला धडकते. त्यावरून लगेचच भांडणे सुरू होतात.

खड्डे बुजवण्याचा अचाट प्रयोग
खराब रस्त्यांचे काम त्वरित करून घेणे ही ठेकेदार कंपनीची जबाबदारी असायला हवी. महापालिकेने त्यांना तसे करायला भाग पाडायला हवे. मात्र तसेही काहीही होताना दिसत नाही. मध्यंतरी खड्डे बुजवण्याचा महापालिकेचा अचाट प्रयोग करण्यात आला. त्यामुळे जिथे हे खड्डे होते तिथे आता डांबरांचे उंचवटे झाले आहेत. मूळ रस्ता व खड्डे बुजवल्यानंतरचा रस्ता एकसंध केले जात नाहीत. त्यातच गटारींची झाकणे अनेक ठिकाणी रस्ता सोडून वर आली आहेत किंवा मग खड्ड्यात गेली आहेत. त्याशिवाय रस्त्यांच्या दोन्ही बाजूंना नव्याने काही बांधकामे सुरू आहेत. त्यांचे बांधकाम साहित्य रस्त्यावर पडलेले असते. त्याकडेही कोणाचेच लक्ष नाही.

...म्हणून फुटपाथ रायडिंग

मागील ३ वर्षे उड्डाणपुलाचे काम सुरू आहे. त्यामुळे मूळचा अरुंद रस्ता निरुंद करून टाकला आहे. रस्त्याच्या मध्य भागापासून दोन्ही बाजूंना पत्रे लावून रस्त्याचा जवळपास १० ते १२ फुटांचा भाग बंदिस्त केला आहे. उरलेल्या रस्त्यावर कुठे क्रेन उभी असते, तर कुठे ट्रक तर कुठे काँक्रिट मिक्स करणारा मोठा मिक्सर. त्यामुळे या रस्त्यावरून सलगपणे वाहन चालवणे अवघड झाले आहे. प्रत्येक ठिकाणी कोंडी झालेली असते. ज्यांना घाई आहे ते वाहनधारक फुटपाथ रायडिंग करतात. पुढे कुठे रस्त्यावर येता येत नसले की तेही अडकतात. त्यातून फूटपाथवरही आता वाहनांची कोंडी होत आहे. या सगळ्या दुरवस्थेला नियंत्रणात आणण्यासाठी तिथे वाहतूक शाखेच्या पोलिसांची आवश्यकता आहे. मात्र ते कधीही दिसत नाहीत. असले तर विठ्ठलवाडी चौकाच्या अलीकडे पावत्या फाडत बसलेले दिसतात.

यंत्रणा झटकते हात

उड्डाणपुलाचे काम घेतलेल्या ठेकेदार कंपनीने तिथे वॉर्डन पुरवणे गरजेचे आहे. महापालिकेने त्याच्यावर तसे बंधनकारक केले असेल, मात्र असे वॉर्डन कुठेही दिसत नाही. राजाराम पूल चौक, हिंगणे चौक, सनसिटीकडून येणारा चौक, अभिरुची मॉलच्या अलीकडचा चौक अशा जवळपास प्रत्येक ठिकाणी दररोज त्रिकाळ वाहतूक कोंडी होत असते. त्याचा ताण या चौकांच्या मागे असणाऱ्या रस्त्यावर येतो. तेही चिंचोळे झाले आहेत. त्यामुळे तिथेही वाहतूक कोंडी होते. ठेकेदार कंपनीने हात झटकले आहेत, महापालिका काहीच करायला तयार नाही; तर वाहतूक शाखेचे म्हणणे आहे की, रस्ता नीट करणे आमचे कामच नाही. या तीनही यंत्रणाच्या बेजबाबदारपणाचा त्रास मात्र सामान्य नागरिकांना आहे. या रस्त्यावरून दररोज ये-जा करणाऱ्या लाखापेक्षा अधिक वाहनधारक पुणेकरांना हे मुकाट्याने सहन करत आहेत.

महापालिकेने अलीकडेच रस्त्यावरील खड्डे बुजवले आहेत. उड्डाणपुलाचे काम सुरू असल्याने संपूर्ण रस्ता तयार करणे आताच शक्य नाही. ठेकेदार कंपनी, महापालिकेचे त्या भागातील अधिकारी यांच्याबरोबर संयुक्त बैठक घेऊन यावर लवकरच मार्ग काढण्यात येईल. - युवराज देशमुख, मुख्य अभियंता, महापालिका

Web Title: sinhagad road traffic It takes half an hour to cover the distance of just one minute

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.