तरुण पिढीला सक्षम करण्यासाठी सिंहगड संस्थेचा पुढाकार; शाळांमध्ये 'द माइंड सिंक' द्वारे भारतातील पहिले मानसिक आरोग्य शिक्षण
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2025 11:23 IST2025-03-13T11:20:30+5:302025-03-13T11:23:23+5:30
मानसिक आरोग्य शिक्षण हा शिक्षणाच्या मुख्य प्रवाहाचा भाग होणार आहे.

तरुण पिढीला सक्षम करण्यासाठी सिंहगड संस्थेचा पुढाकार; शाळांमध्ये 'द माइंड सिंक' द्वारे भारतातील पहिले मानसिक आरोग्य शिक्षण
विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्याच्या गरजा पूर्ण करण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल उचलत, सिंहगड इन्स्टिट्यूट्सने संपूर्ण महाराष्ट्रातील आपल्या सर्व शाळांमध्ये 'द माइंड सिंक’ आणि 'मेंटल हेल्थ एज्युकेशन इंक., फ्लोरिडा' यांच्या भारतातील पहिल्या 'मेंटल हेल्थ एज्युकेशन करिक्युलम’ उपक्रमला स्वीकारले आहे. या निर्णयामुळे शालेय शिक्षणाच्या पद्धतीत मोठा बदल होणार असून, मानसिक आरोग्य शिक्षण हा शिक्षणाच्या मुख्य प्रवाहाचा भाग होणार आहे. हावर्ड प्रशिक्षित मानसोपचारतज्ज्ञ डॉ. शिवम दुबे आणि 'द माइंड सिंक किड्स'चे संस्थापक आणि संचालक मानस दुबे यांच्या नेतृत्वाखाली या उपक्रमाची रचना करण्यात आली आहे. भावनिक बुद्धिमत्ता आणि परस्पर संबंधांवरील विस्तृत संशोधनाच्या आधारावर तयार झालेली ही योजना विद्यार्थ्यांमध्ये भावनिक स्थैर्य निर्माण करण्याच्या उद्देशाने तयार करण्यात आली आहे.
हा उपक्रम विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्यासाठी आवश्यक असलेल्या भावनिक साक्षरतेवर भर देतो. या अभ्यासक्रमामुळे विद्यार्थ्यांना त्यांच्या भावनांची जाणीव होईल आणि तणाव, चिंता आणि सामाजिक समस्यांवर योग्य पद्धतीने मात करण्याच्या कौशल्यांची जाण होईल.
राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद (NCERT), शिक्षण मंत्रालय आणि राष्ट्रीय शिक्षण धोरण (NEP) 2020 यांनी विद्यार्थ्यांमध्ये वाढत्या मानसिक आरोग्य समस्यांविषयी महत्त्वाच्या शिफारसी केल्या आहेत. यात चिंता, शरीराविषयी असमाधान, लक्ष केंद्रित करण्यातील अडचणी आणि सामाजिक पाठबळाचा अभाव यासारख्या समस्यांचा उल्लेख आहे. त्यामुळे मानसिक आरोग्य शिक्षणाला शालेय अभ्यासक्रमात समाविष्ट करणे, शिक्षकांना प्राथमिक स्तरावरील समुपदेशक म्हणून प्रशिक्षण देणे आणि नियमित मूल्यमापन करणे या बाबींचा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे. याच पार्श्वभूमीवर, 'द माइंड सिंक करिक्युलम' संशोधनाधारित आणि संरचित दृष्टिकोनासह मानसिक आरोग्य शिक्षणाचा समावेश करते.
या अभ्यासक्रमात पाच महत्त्वाच्या सामाजिक-भावनिक शिक्षण (SEL) कौशल्यांचा समावेश आहे – आत्मजाणीव, आत्मव्यवस्थापन, सामाजिक जाणीव, परस्पर संबंध कौशल्ये आणि जबाबदारीने निर्णय घेणे. हे सर्व घटक शालेय जीवनात समाविष्ट करून विद्यार्थ्यांना आत्मविश्वास, भावनिक स्थैर्य आणि अडचणींवर मात करण्यासाठी सक्षम केले जाईल.
मानसिक आरोग्य शिक्षण अधिक प्रभावी आणि सर्वसमावेशक करण्यासाठी 'माइंड सिंक किड्स'ने 'त्रिकोण प्रशिक्षण तत्वज्ञान' अवलंबले आहे. यात तीन प्रमुख घटकांचा समावेश आहे – विद्यार्थी, पालक आणि शिक्षक.
शिक्षकांना विशेष प्रशिक्षण देऊन त्यांना प्रमाणित मानसिक आरोग्य शिक्षक म्हणून तयार केले जाईल.
अभ्यासक्रमाच्या माध्यमातून मानसिक आरोग्य शिक्षण वर्गात समाविष्ट केले जाईल, जे संशोधनाधारित आणि कृतीप्रधान पद्धतीने शिकवले जाईल.
वयोगटानुसार साप्ताहिक सत्रे घेतली जातील, तसेच विद्यार्थी घरी 'माइंड सिंक किड्स' अॅपच्या मदतीने कौशल्यांचा सराव करतील.
विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्याच्या प्रगतीसाठी वर्षभर विविध टप्प्यांवर कौशल्य मूल्यमापन केले जातील.
पालकांसाठी विशेष मार्गदर्शन सत्रे आयोजित केली जातील, ज्यामुळे त्यांना त्यांच्या मुलांच्या मानसिक आरोग्यास मदत करण्याच्या योग्य पद्धती शिकता येतील.
' द माइंड सिंक'च्या वतीने पुण्याच्या मानसशास्त्रज्ञ मयुरी गोडबोले या प्रोग्राम मॅनेजर म्हणून कार्यरत राहणार असून, सिंहगड शाळेच्या सर्व शाखांमध्ये हा उपक्रम सुरळीत आणि वेळेत राबविण्यासाठी त्या जबाबदारी सांभाळतील.
सिंहगड शाळांनी महाराष्ट्रभर १२,००० हून अधिक विद्यार्थ्यांसाठी भारतातील पहिल्या अभ्यासक्रमाधारित मानसिक आरोग्य शिक्षण उपक्रमाचा स्वीकार केला आहे. विद्यार्थ्यांमध्ये वाढत चाललेला तणाव, चिंता आणि सामाजिक दबाव लक्षात घेता हा निर्णय अत्यंत महत्त्वपूर्ण ठरत आहे.
सिंहगड इन्स्टिट्यूट्सच्या संस्थापक सचिव डॉ. सुनंदा नवले यांनी मानसिक आरोग्य शिक्षणाच्या आवश्यकतेवर भर दिला. त्या म्हणाल्या, "विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्याशी संबंधित वाढत्या चिंतांचा विचार करता, मानसिक आरोग्य शिक्षणाला शारीरिक व शैक्षणिक शिक्षणाइतकेच महत्त्व देणे गरजेचे आहे. लहान वयातच भावनिक स्थैर्य निर्माण करून विद्यार्थ्यांना आत्मविश्वासाने आयुष्यातील आव्हानांचा सामना करण्यास सक्षम करणे आवश्यक आहे. मी सर्व शैक्षणिक संस्थांना 'द माइंड सिंक'च्या मानसिक आरोग्य शिक्षण कार्यक्रमाचा अवलंब करण्याचे आवाहन करते, जेणेकरून देशभरातील विद्यार्थ्यांना याचा लाभ मिळू शकेल."
हा निर्णय निश्चितच स्तुत्य असून, भारतीय शिक्षण व्यवस्थेत मानसिक आरोग्य शिक्षणाचा मोठा प्रभाव पडणार आहे. यामुळे भविष्यात भावनिकदृष्ट्या सशक्त, आत्मजाणीव असलेली आणि सामाजिकदृष्ट्या जबाबदार व्यक्तिमत्त्वे घडतील. भविष्यात अधिकाधिक शाळांनी मानसिक आरोग्य शिक्षणाचा स्वीकार केल्यास, भारतात एक भावनिकदृष्ट्या सशक्त आणि आत्मभान असलेली पिढी निर्माण होईल.
अधिक माहितीसाठी या संकेतस्थळाला भेट द्या.
www.themindsynckids.in