Sinhgad Express: सिंहगड एक्स्प्रेसचा वेग मंदावला; अनेक वेळा उशिराने धावते गाडी, प्रवाशांची गैरसोय
By ऑनलाइन लोकमत | Published: December 19, 2023 10:06 AM2023-12-19T10:06:12+5:302023-12-19T10:07:05+5:30
सिंहगड एक्स्प्रेस वेळेत धावली पाहिजे, अशी मागणी प्रवाशांकडून होत आहे....
पुणे : सिंहगड एक्स्प्रेसमधून दररोज नोकरदार, व्यापारी, नागरिक पुणे-मुंबई दरम्यान प्रवास करणाऱ्यांची संख्या जास्त आहे. पुण्यातून वेळेवर निघणारी सिंहगड एक्स्प्रेस गेल्या काही दिवसांपासून मुंबईत उशिराने पोहोचत आहे. या मार्गावर दररोज ये-जा करणाऱ्या चाकरमान्यांना कामाच्या ठिकाणी पोहोचण्यासाठी उशीर होत आहे. परिणामी अनेकांना लेटमार्क लागत आहे. त्यामुळे २०-२५ मिनिटांमुळे हाफ डे लागत आहे. त्यामुळे सिंहगड एक्स्प्रेस वेळेत धावली पाहिजे, अशी मागणी प्रवाशांकडून होत आहे.
सिंहगड एक्स्प्रेस पुणे रेल्वेस्थानकावरून सकाळी ६:०५ वाजता सुटते. पुढे ती खडकी, पिंपरी, चिंचवड, लोणावळा, कर्जत, दादर येथे थांबे घेत सकाळी ९:५५ वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथे पोहोचण्याची वेळ आहे. परंतु, गेल्या काही दिवसांपासून कर्जतला गेल्यावर सिग्नल मिळत नाही. त्यामुळे या गाडीला २० ते ३० मिनीट उशीर होत आहे. गेल्या काही दिवसांपासून या गाडीचा वेग मंदावल्याने प्रवास करणाऱ्या नोकरदार वर्गाला मोठा फटका बसत आहे.
सिंहगड एक्स्प्रेस पुण्यातून सकाळी वेळेत निघते. परंतु, कर्जतच्या पुढे गेल्यावर या गाडीला सिग्नल मिळत नाही. काही वेळा लोकल सोडले जातात. त्यामुळे २० ते ३० मिनिटे उशीर होतो. त्यामुळे नोकरदारांचा विचार करून या गाडीला वेळेवर धावण्यासाठी रेल्वे विभागाने प्रयत्न करावेत.
- नितीन सोनवणे, प्रवासी