साहेब आमच्या लेकरा-बाळांनी जगायचे कसे? कंत्राटी कामगारांचा आर्त सवाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 1, 2020 05:15 PM2020-10-01T17:15:54+5:302020-10-01T17:16:13+5:30
प्रशासन ठेकेदाराविरोधातील घोषणांनी टिळक रोड क्षेत्रीय कार्यालय दणाणले
पुणे : साहेब, आम्हाला चार महिने पगार नाही. आम्ही आणि आमच्या लेकराबाळांनी काय खायचे? पोटात कोळसा घालून जगायचे का? असा सवाल कंत्राटी कामगारांनी पालिकेच्या अधिकाऱ्यांना केला. कोरोनाच्या काळातही आपल्या जीवाची बाजी लावत काम करणाऱ्या कंत्राटी स्वच्छता कर्मचाऱ्यांना चार महिन्यांपासून वेतन नाही. वारंवार पाठपुरावा करूनही पदरी निराशा पडलेल्या या कर्मचाऱ्यांनी गुरुवारी पालिकेच्या टिळक रोड क्षेत्रीय कार्यालयावर धडक देत ठिय्या आंदोलन केले.
वेतन मिळत नाही तोपर्यंत क्षेत्रीय कार्यालयातून हलणार नाही असा पवित्रा आंदोलकांनी घेतला. यावेळी आंदोलकांनी उपायुक्त जयंत भोसेकर आणि क्षेत्रीय अधिकारी जयश्री काटकर यांच्याकडे आपली कैफियत मांडली. परंतु, हे अधिकारी टाळाटाळ करणारी मोघम उत्तरे देत असल्याचे आंदोलकांनी सांगितले. प्रशासनाच्या उदासीन काराभराविरोधात यावेळी घोषणाबाजी करण्यात आली. कामगारांचे हक्क नाकारून ठेकेदारांना पोसणाऱ्या अधिकाऱ्यांचा यावेळी निषेध करण्यात आला.
यावेळी आक्रमक झालेल्या कामगार युनियनच्या महानंदा कांबळे, सुभाष गोराड, कुणाल शिलवंत, बाबा निक्षे, बालाजी वायकर, संगीता बनसोडे यांनी प्रशासन ठेकेदार धार्जिणे असल्याची टीका केली.
कोरोना काळात आर्थिक संकट ओढवले आहे. गरीब कष्टकरी वर्गावर उपासमारीची वेळ आहे. अशा परिस्थितीत कंत्राटी कामगारांना वेतन न देता राबवून घेतले जात आहे. आम्ही कसे जगायचे, आमच्या लेकरांबाळांनी काय खायचे असा सवाल या कंत्राती कामगारांनी केला. आम्हाला तात्काळ वेतन मिळावे आणि ठेकेदारांवर कारवाई करावी अशी मागणी केली.