साहेब, लसीकरण, आरटीपीसीआर टेस्ट आणि रेमडेसिविर इंजेक्शन घेण्यासाठी बाहेर आलोय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2021 04:11 AM2021-04-13T04:11:29+5:302021-04-13T04:11:29+5:30
पुणे : साहेब, दवाखान्यात जायचंय... लसीकरणासाठी बाबांना घेऊन जायचंय म्हणून बाहेर पडलोय. डॉक्टरांनी प्रिस्क्रिप्शन दिलंय, रेमडेसिविरचे इंजेक्शन हवंय. या ...
पुणे : साहेब, दवाखान्यात जायचंय... लसीकरणासाठी बाबांना घेऊन जायचंय म्हणून बाहेर पडलोय. डॉक्टरांनी प्रिस्क्रिप्शन दिलंय, रेमडेसिविरचे इंजेक्शन हवंय. या कारणांसाठी वीकेंड लॉकडाऊन’मध्ये पुणेकरांनी घरचा उंबरठा ओलांडला...मात्र या कारणांसाठी अडवणूक आणि कारवाई न करता पोलिसांनी सहकार्याची भूमिका बजावली. शुक्रवारी (दि.९) सायंकाळी ६ वाजल्यापासून ते सोमवारी (दि.१२) सकाळी ७ वाजेपर्यंत १८८ कलमांतर्गत विनाकारण बाहेर पडलेल्या एकूण १६२ लोकांवर कारवाई करण्यात आल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, याकाळात मास्क न घालणा-यांवर कारवाईचा बडगा उगारला. दि.१० एप्रिलला १०५५ जणांवर, तर दि.११ एप्रिलला ११८६ जणांवर मास्क परिधान न केल्याबददल कारवाई करण्यात आली.
राज्यासह पुण्यात कोरोना साखळी तोडण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी दर आठवड्याच्या शनिवारी आणि रविवारी ‘वीकेंड लॉकडाऊन’ जाहीर केले आहे. शुक्रवारी सायंकाळी ६ पासून ते सोमवारी सकाळी ७ वाजेपर्यंत हा लॉकडाऊन घोषित केला आहे. यात अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने बंद ठेवली जाणार आहे. कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. याकाळात पुणेकरांनी महत्वाच्या कारणांशिवाय घराबाहेर पडल्यास पोलिसांनी कारवाईचे संकेत दिले आहेत. गेल्या आठवड्यात या ‘वीकेंड लॉकडाऊन’चा श्रीगणेशा झाला. पुणेकर या लॉकडाऊनला कसा प्रतिसाद देतात, याकडे प्रशासन आणि पोलिसांचे लक्ष होते. मात्र बहुतांश पुणेकर हे वैद्यकीय कारणांसाठीच घराबाहेर पडले. विनाकारण बाहेर पडलेले नागरिक अत्यंत कमी होते. वीकेंड लॉकडाऊनला पुणेकरांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याने कारवाईची फारशी वेळ आली नसल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.
---
१० एप्रिल ११ एप्रिल
मास्क कारवाई - १०५५ ११८६
दंडाची रक्कम - ५,०४,००० ५,३४,६००
---
दि. १२ एप्रिलची सकाळी ५ पर्यंत ची
एकूण मास्क कारवाई- २,८६,३६२
एकूण दंडाची रक्कम - १३,९२,६६,५००
---
शहरात संपूर्ण कडक निर्बंध लागू केले होते. कुणी फिरायला वगैरे नव्हे तर बहुतांश पुणेकर हे वैद्यकीय बाबी, लसीकरण, आरटीपीसीआर टेस्ट आणि रेमडेसिविर इंजेक्शन घेण्यासाठी बाहेर पडल्याचे दिसले. विनाकारण बाहेर पडलेल्यांवर कारवाई करण्यात आली. पण ती संख्या फारशी नव्हती. पुणेकरांनी लॉकडाऊनला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
- डॉ. रवींद्र शिसवे, सह पोलीस आयुक्त