साहेब, तुमचं ऐकतो, पण मारता कशाला?
By ऑनलाइन लोकमत | Published: March 24, 2020 02:39 PM2020-03-24T14:39:49+5:302020-03-24T14:40:11+5:30
घराबाहेर पडणाऱ्या नागरिकांना पोलिसांच्या लाठीचा प्रसाद
पुणे : कोरोना विषाणूचा दिवसेंदिवस वाढत जाणारा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पुणे पोलीस प्रशासनाकडून जमावबंदी, संचारबंदी लागू केली आहे. रस्त्यावर कुणीही फिरकू नये, असे प्रशासनाने आवाहन केले आहे. मात्र तरीही काही महत्त्वाच्या कामांकरिता घराबाहेर पडणाऱ्या नागरिकांवर पोलीस लाठीचार्ज करीत असल्याचे दिसून आले आहे. यामुळे अनेक नागरिकांनी याबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. यात प्रसारमाध्यमांत काम करणाऱ्या व्यक्तींना देखील पोलिसांच्या लाठीचा प्रसाद मिळाला आहे.
शहरातील सिंहगड रस्ता, कर्वे रस्ता, जंगली महाराज रस्ता, डेक्कन बस स्टॉप याशिवाय लक्ष्मी रस्ता, टिळक रस्ता या प्रमुख रस्त्यांवर बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आलेल्या पोलिसांकडून वाहतूकदारांवर हात उगारला जात असल्याने त्याबद्दल उलट - सुलट चर्चेला उधाण आले आहे. या सगळयात नागरिकांकडून पोलिसांना विनंती करण्यात येत आहे. त्यात ‘साहेब तुमचं ऐकतो, पण मारता कशाला?’ असे म्हणून नागरिक विनवणी करीत आहेत.
रविवारी रात्री जनता कर्फ्यूला पुणेकर नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. सकाळी सात ते रात्री नऊपर्यंत रस्त्यांवर शुकशुकाट होता. पुढे प्रशासनाने पहाटे पाचपर्यंत त्याची मुदत वाढवल्याने त्यालादेखील नागरिकांनी सहकार्य केले. पोलीस प्रशासनाकडून संचार व जमावबंदी लागू करण्याचे आदेश जाहीर झाल्यानंतर त्यावर कडक अंमलबजावणीचे आदेश पोलीस कर्मचाऱ्यांना देण्यात आले. मात्र या आदेशाची अंमलबजावणी करताना त्यांनी नागरिकांना समज देण्याऐवजी मारण्यास सुरुवात केल्याचे
दृश्य सोशल माध्यमांवर व्हायरल झाले आहे. यामुळे मोठी खळबळ उडाली आहे.
.........
काहीही न विचारता थेट काठीने मारहाण केली
नागरिक महत्त्वाच्या कामानिमित्त घराबाहेर पडले होते. अशा वेळी पोलिसांनी त्यांना अडवून काहीही न विचारता थेट काठीने मारहाण केली आहे, अशी तक्रार अनेक नागरिकांनी ‘लोकमत’कडे दूरध्वनीद्वारे केली आहे. पोलीस उपायुक्तांनी पोलीस कर्मचाºयांना लाठीचार्ज करू नका, असे सांगितल्यानंतरदेखील त्यांच्याकडून तो सुरूच असल्याची माहिती सूत्रांनी दिली. सध्या शहरातील सर्वच रस्त्यांवर पोलिसांनी नाकाबंदी केली असून येणाºया-जाणाºया वाहतूकदारांना समज देऊन जाऊ न देता फटके मारण्यावर भर दिला जात आहे.