साहेब, एक ऑक्सिजन बेड उपलब्ध करून द्या !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2021 04:10 AM2021-04-19T04:10:06+5:302021-04-19T04:10:06+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : गृहविलगीकरणात असलेल्या कोरोनाबाधिताची प्रकृती खालवली आहे, आॅक्सिजन बेडसाठी खासगी रुग्णालयांचे उंबरठे झिजवूनही आम्हाला बेड ...

Sir, make an oxygen bed available! | साहेब, एक ऑक्सिजन बेड उपलब्ध करून द्या !

साहेब, एक ऑक्सिजन बेड उपलब्ध करून द्या !

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : गृहविलगीकरणात असलेल्या कोरोनाबाधिताची प्रकृती खालवली आहे, आॅक्सिजन बेडसाठी खासगी रुग्णालयांचे उंबरठे झिजवूनही आम्हाला बेड मिळत नाहीत़ म्हणून आम्ही महापालिकेच्या कोविड वॉर रूमकडे एक आशेचा किरण म्हणून पाहत आहोत़ काहीही करा साहेब, पण एक बेड उपलब्ध करून द्या! अशी विनंती दररोज महापालिकेच्या वॉर रूममध्ये रुग्णांच्या नातेवाईकांकडून होत आहे़ येथे दिवसाला येणा-या ८०० ते १००० फोनपैकी बहुतांशी फोन हे आॅक्सिजन बेडसाठीच असतात़ त्यामुळे सर्वांना बेड लागलीच देता येत नसला तरी, संबंधितांचे मोबाइल क्रमांक घेऊन बेडची उपलब्धता झाल्यास त्यांना कळविले जात आहे़

महापालिकेच्या मुख्य इमारतीत कोविड वॉर रूम उभारण्यात आली असून, याद्वारे महापालिकेच्या तथा शहरातील इतर खासगी रुग्णालयांमधील बेड उपलब्ध करून देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे़ आयसीयू व व्हेंटिलेटर बेडसाठी जर कॉल असेल तर मात्र अनेकांना निराशा पत्करावी लागत असून, शहरात हे बेडच कमी असल्याने वॉर रूममधूनही अनेकदा नकार दिला जात आहे़

महापालिकेच्या वॉर रूममध्ये ०२०-२५५०२११० या क्रमांकावर कोरोनाबाधितासाठी घरात स्वतंत्र राहण्याची सोय नाही म्हणून, कोविड केअर सेंटरमध्ये बेड मिळावा याकरिताही कॉल येत आहेत़ तर बहुतांशी कॉल हे साधे बेड, होम आयसोलशेनमध्ये असल्यावर काय उपचार घ्यावेत, महापालिकेच्या कोणत्या डॉक्टरांशी संपर्क साधावा यासाठीही असल्याने संबंधितांना त्यांचेही क्रमांक येथून देण्यात येत आहेत़ दरम्यान आता या ठिकाणी अनेक जण रेमडेसिविर इंजेक्शनकरिताही कॉल करीत असल्याने, येथे केवळ बेडसाठीच नोंद होत असल्याचे कर्मचा-यांना सांगावे लागत आहे़

------------------

३ शिफ्टमध्ये ७० सेवक

महापालिकेच्या मुख्य इमारतीत असलेल्या कोविड वॉर रूममध्ये सद्यस्थितीला ३ शिफ्टमध्ये ७० सेवक काम करीत आहेत़ त्यांच्याकडून कॉल घेण्यापासून, कॉल करणा-या व्यक्तीच्या नोंदी करणे, रुग्णांचा तपशील घेणे, त्याच्या आजाराच्या लक्षणांची व आॅक्सिजन पातळीची नोंद घेणे व संबंधितांचा फॉर्म भरणे आदी कामे केली जातात़ तसेच अनेकांना पुन्हा कॉल करून बेड उपलब्ध झाला असून, त्याबाबतची माहिती व वॉररूमद्वारे दिला जाणारा बेड क्रमांक व रुग्णालयही सांगितले जात आहे़

------------

महापालिकेची कोविड वॉर रूम २४ तास कार्यरत असून, येथे ७० सेवक काम करीत आहेत़ शहरातील आॅक्सिजन बेडची कमतरता पाहता, येथे साधारणत: आॅक्सिजन बेडसाठी मोठ्या प्रमाणात कॉल येतात़ सर्वांना लागलीच बेड उपलब्ध नसल्याने ते देणे शक्य होत नाही़ मात्र संबंधितांचे मोबाईल क्रमांक घेऊन बेड उपलब्ध झाल्यावर त्यांना लागलीच कळविले जात आहे़ वॉर रूममध्ये दररोज सुमारे एक हजार कॉल येत असून, प्रत्येकाची मागणी पूर्ण करण्याचा आमचा प्रयत्न असतो़

डॉ़ मनीषा नाईक,

सहायक आरोग्य प्रमुख पुणे मनपा़

------------------------

Web Title: Sir, make an oxygen bed available!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.