साहेब, पावसाळा आला... रस्ते खुदाई रोखा, दुरुस्ती करा; उपनगरांतील नागरिकांची मागणी
By निलेश राऊत | Published: May 23, 2024 01:54 PM2024-05-23T13:54:08+5:302024-05-23T13:55:29+5:30
पुणे : साहेब, तुम्ही सांगता रस्ते खुदाईला आता परवानगी नाही. नुकत्याच ‘लोकमत’ने केलेल्या पाहणीत एक रस्ता कुठलीही परवानगी न ...
पुणे : साहेब, तुम्ही सांगता रस्ते खुदाईला आता परवानगी नाही. नुकत्याच ‘लोकमत’ने केलेल्या पाहणीत एक रस्ता कुठलीही परवानगी न घेता खोदला गेला; पण अशा प्रकारांवर महापालिकेचा पथ विभाग काय कारवाई करणार हा प्रश्न आहे. या खुदाईमुळे नागरिकांचे मात्र मोठ्या प्रमाणात नुकसान होत असून, तुमची कारवाई नको, पण यामुळे नागरिकांचे होणारे नुकसान टाळण्यासाठी या रस्त्यांची तातडीने दुरुस्ती तरी करा अशी अपेक्षा नागरिक करीत आहेत.
३० एप्रिलनंतर शहरात कुठेही खुदाई करण्यास परवानगी नाही, असे आदेश महापालिकेच्या पथ विभागाने काढले. समान पाणी पुरवठा योजना, ड्रेनेज, आदी अत्यावश्यक कामांना रस्ते खुदाई मान्य आहे; पण महापालिकेची परवानगी न घेता शहरात किंबहुना उपनगरात सर्रास रस्ते खुदाई सुरू आहे. यावर कोणाचेच नियंत्रण नाही. पावसाळ्यापूर्वी शहरातील सर्व रस्ते सुव्यवस्थित करणार असे सांगणारी महापालिका याकडे कधी लक्ष देणार? याकडे गांभीर्याने पाहणार नाही का. अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या पावसाळ्यापूर्वी रस्ते दुरुस्तीचे आव्हान महापालिका पेलू शकणार आहे का, की दरवर्षीप्रमाणे शहरात रस्त्यांवरील खड्डे यंदाही वाहनचालकांना डोकेदुखी ठरणार, असे सध्याच्या परिस्थितीवरून दिसत आहे.
बालेवाडी येथे लक्ष्मी माता मंदिरापासून बालेवाडी गावठाणापर्यंत नुकतेच डांबरीकरण करण्यात आले हेाते; पण याच सुस्थितीतील रस्त्यावर खुदाई करून एमएसइबीच्या ठेकेदाराने खुदाई करून केबल टाकली. पण, याबाबत महापालिकेच्या अधिकाऱ्यांकडे विचारणा केली असता, आम्ही याबाबत चौकशी करून कारवाई करू अशी उत्तरे दिली गेली आहेत. तर संबंधित ठेकेदाराने हा रस्ता आम्ही तातडीने पूर्ववत करून देणार असल्याचा दावा केला. आज त्यास तीन दिवस झाले तरी या खुदाईवरील दुरुस्ती मात्र झालेली नाही. दरम्यान, याबाबत महापालिकेच्या पथ विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता, त्यांनी संबंधित ठेकेदारावर परवानगी नसल्याने तिप्पट दंड आकारणी केली जाणार असल्याचे सांगितले.