लग्न जुळत नसल्याचं नैराश्य, सख्या बहीण-भावाची आत्महत्या
By ऑनलाइन लोकमत | Published: October 18, 2018 11:40 AM2018-10-18T11:40:37+5:302018-10-18T12:19:52+5:30
लग्न जुळत नसल्याने बहीण आणि भावाने विषारी औषध घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे.
दावडी (पुणे) - लग्न जुळत नसल्याने बहीण आणि भावाने विषारी औषध घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. खेड तालुक्यातील डेहणेतील ही घटना आहे. रंजन भोपळे आणि शैला भोपळे असे आत्महत्या केलेल्या बहीण-भावाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खेड तालुक्यातील डेहणेगाव येथे राहत्या घरी विषारी औषध पिऊन रंजन भोपळे ( वय ४० वर्ष) आणि शैला भोपळे( वय ३८ वर्ष) यांनी आत्महत्या केली. दोघेही डेहणेगाव येथे एकत्र राहत होते. काही वर्षांपूर्वी त्यांच्या आईवडिलांचे निधन झाले. रंजनचा विवाह झाला असून त्याचा पत्नीसोबत घटस्फोट झाला होता. रंजनला दुसरा विवाह करायचा होता तसेच बहीणदेखील अविवाहित होती, पण तिचा विवाह जुळत नव्हता. याच नैराश्यातून त्यांनी आत्महत्या केली असावी अशी प्राथमिक माहिती खेड पोलिसांनी दिली आहे.
दुपारपासून घर बंद असल्याने त्यांची चुलत बहीण पाहण्यासाठी गेली. तेव्हा हा प्रकार उघडकीस आला. शैलाचा श्वास सुरू असल्याचं लक्षात आल्यानंतर ग्रामस्थांनी तातडीने तिला खासगी रुग्णालयात हलवले. परंतु तिचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला. दरम्यान या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. घटनेचा अधिकचा तपास खेड पोलीस करत आहेत