पुणे येथे आईला वाचविण्याच्या प्रयत्नात बहीण, भाऊ बुडाले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 8, 2018 07:37 PM2018-10-08T19:37:06+5:302018-10-08T19:38:17+5:30
पानशेत भागातील आंबी नदीत कपडे धुताना पडलेल्या आईला वाचविण्याचा प्रयत्न करणारी बहीण आणि भाऊ बुडाल्याची दुदैवी घटना रविवारी घडली.
पुणे : पानशेत भागातील आंबी नदीत कपडे धुताना पडलेल्या आईला वाचविण्याचा प्रयत्न करणारी बहीण आणि भाऊ बुडाल्याची दुदैवी घटना रविवारी घडली. वैष्णवी दत्ता भगत (वय १४) आणि कुणाल (वय १७, दोघे रा. वडगाव बुद्रुक, सिंहगड रस्ता) अशी बुडालेल्या भावंडाची नावे आहेत. नवरात्रोत्सवानिमित्त वैष्णवी, कुणाल, त्यांची आई सविता (वय ४५) हे पानशेत भागातील आंबी नदीत कपडे धुण्यासाठी गेले होते. उत्सव सुरू होण्यापूर्वी घरातील कपडे, अंथरूणे धुण्याची प्रथा आहे. वैष्णवी, कुणाल, त्यांचा मामेभाऊ आणि आई सविता हे रिक्षातून तेथे गेले होते. दुपारी दीडच्या सुमारास सविता आंबी नदीच्या पाण्यात कपडे धुत होत्या. त्यावेळी घसरून पडल्याने त्या बुडाल्या. काठावर असलेल्या वैष्णवी आणि कुणाल यांनी हा प्रकार पाहिला. त्यांनी नदीपात्रात उडी मारली. दरम्यान, त्यांच्या पाठोपाठ मामेभावाने नदीपात्रात उडी मारली. त्याने तत्परता दाखवून कुणाल आणि वैष्णवीला पाण्यातून बाहेर काढले. त्यानंतर त्याने पाण्यातून सविता यांना बाहेर काढण्यास प्रयत्न सुरू केले. दरम्यान, काठावर आल्यानंतर वैष्णवी आणि कुणाल यांनी पुन्हा पाण्यात उडी मारली. सविता यांना पाण्यातून बाहेर काढले. या घटनेत कुणाल आणि वैष्णवी बुडाले. या घटनेची माहिती मिळताच वेल्हा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुवर्णा हुलवान यांनी घटनास्थळी धाव घेतली. वैष्णवी आणि कुणाल यांचे मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आले. याप्रकरणी वेल्हा पोलिसांनी अकस्मात मृत्यू अशी नोंद केली आहे. कुणाल आणि वैष्णवीच्या मामेभावाने दिलेला जबाब नोंदवून घेण्यात आला आहे.