बहिणीने लिंक पाठवली अन् ५० लाखांची फसवणूक झाली; सदाशिव पेठेतील घटना
By भाग्यश्री गिलडा | Published: April 17, 2024 06:41 PM2024-04-17T18:41:29+5:302024-04-17T18:41:58+5:30
याप्रकरणी सदाशिव पेठेत राहणाऱ्या एका ५६ वर्षीय महिलेने मंगळवारी (दि. १६) सायबर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.....
पुणे : बहिणीने पाठवलेल्या स्टॉक मार्केटच्या लिंकवर क्लिक करून त्याद्वारे ट्रेडिंग करून तब्बल ५० लाखांची फसवणूक झाल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी सदाशिव पेठेत राहणाऱ्या एका ५६ वर्षीय महिलेने मंगळवारी (दि. १६) सायबर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
अधिक माहितीनुसार हा प्रकार जानेवारी ते एप्रिल यादरम्यानच्या काळात घडला आहे. तक्रारदार महिलेच्या बहिणीने रेफरन्स इन्व्हाईट लिंक पाठवून त्याद्वारे स्टॉक एलिट नावाचा ग्रुप जॉईन करण्यास सांगितला. आदित्य पाटील नावाच्या व्यक्तीने तो ग्रुप बनवलेला होता. त्याने तक्रारदार महिलेला एका व्हीआयपी ग्रीपची लिंक पाठवली. फिर्यादींनी त्या लिंकद्वारे व्हीआयपी ग्रुप जॉईन केला. त्यानंतर फिर्यादींना मेम्बरशीप घेण्याचे सांगून सुरुवातीला नफ्याचे आमिष दाखवून २ लाख रुपये भरण्यास सांगितले. फिर्यादींना विश्वास बसल्याने त्यांनी पैसे पाठवल्यावर बनावट लिंकद्वारे नफा मिळत असल्याचे भासवून महिलेला आणखी पैशांची गुंतवणूक करण्यास भाग पाडले.
महिलेने एकूण ५० लाख रुपये भरल्यावर संशय आल्याने त्यांनी पैसे काढण्याचा प्रयत्न केला. मात्र पैसे निघत नव्हते म्हणून महिलेने विचारणा केली. त्यावेळी आणखी पैसे भरण्याचा तगादा लावला जात होता त्यामुळे आपली फसवणूक झाल्याचे महिलेच्या लक्षात आले. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक संपतराव नाईक करत आहेत.