कॅम्पमध्ये सैराटची आवृत्ती; भावानेच केला बहिणीच्या पतीचा खून
By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2019 11:51 PM2019-03-23T23:51:12+5:302019-03-23T23:51:30+5:30
प्रेमप्रकरणातून बहिणीने लग्न केल्याने रागाच्या भरात भावाने आपल्या बहिणीच्या पतीवर धारदार शस्त्राने वार करुन त्याचा खून करण्याचा खळबळजनक प्रकार कॅम्पमध्ये रात्री घडला.
पुणे : प्रेमप्रकरणातून बहिणीने लग्न केल्याने रागाच्या भरात भावाने आपल्या बहिणीच्या पतीवर धारदार शस्त्राने वार करुन त्याचा खून करण्याचा खळबळजनक प्रकार कॅम्पमध्ये रात्री घडला.
सुलतान महमंदहुसेन सय्यद (वय २४, रा. महंमदवाडी रोड) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. हा प्रकार कॅम्पमधील मारझोरियन बेकरीजवळ शनिवारी रात्री सात वाजण्याच्या सुमारास घडला. अरबाज कुरेशी व त्याच्या साथीदारांनी हा खून केल्याची प्राथमिक माहिती पोलिसांना मिळाली आहे. याबाबत मिळालेली माहिती अशी, सुलतान सय्यद हा नारळ विक्रीचा व्यवसाय करतो. सुलतान याने प्रेमप्रकरणातून एक वर्षापूर्वी विवाह केला होता. मात्र, या मुलींच्या घरच्यांना हा विवाह मान्य नव्हता. त्यातून त्यांच्यात यापूर्वी अनेकदा वाद झाले होते. सुलतान हा कॅम्पमधील वंडरलँड येथे नारळपाणी विक्रीचा व्यवसाय करतो.
शनिवारी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास अरबाज व त्याचे दोन साथीदार तेथे आले. त्यांच्यात तेथे पुन्हा वाद झाला. रागाच्या भरात अरबाज व त्याच्या साथीदारांनी सुलतानच्या पोटावर रॅम्बो चाकूने सपासप वार केले. रक्ताच्या थारोळ्यात सुलतान पडल्यानंतर ते तिघेही पळून गेले. लोकांनी सुलतान याला जवळच्या रुग्णालयात नेले. मात्र, उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच लष्कर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रकांत भोसले व त्यांचे सहकारी घटनास्थळी पोहचले. पोलिसांना खुन करणाऱ्या तिघांची नावे समजली असून त्यांचा शोध घेण्यास पोलीस रवाना झाले आहेत.