एफआरपीसाठी सोलापूर शिवसेनेचे साखर आयुक्तालयात ठिय्या आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2020 04:28 AM2020-12-15T04:28:03+5:302020-12-15T04:28:03+5:30

पुणे : कोल्हापूर, सातारा, सांगली या जिल्ह्यांमध्ये यंदाच्या गाळप हंगामातील उसाची टननिहाय रास्त किफायतशीर किंमत (एफआरपी) देण्यास सुरूवात झाली. ...

Sit-in agitation at Solapur Shiv Sena's Sugar Commissionerate for FRP | एफआरपीसाठी सोलापूर शिवसेनेचे साखर आयुक्तालयात ठिय्या आंदोलन

एफआरपीसाठी सोलापूर शिवसेनेचे साखर आयुक्तालयात ठिय्या आंदोलन

Next

पुणे : कोल्हापूर, सातारा, सांगली या जिल्ह्यांमध्ये यंदाच्या गाळप हंगामातील उसाची टननिहाय रास्त किफायतशीर किंमत (एफआरपी) देण्यास सुरूवात झाली. सोलापूरमधील साखर कारखाने मात्र गाळप हंगाम सुरू होऊन महिना झाला तरी अद्याप छदाम द्यायला तयार नाहीत, असा आरोप करत शिवसेनेच्या सोलापूर शाखेने सोमवारी दुपारी साखर आयुक्त कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केले.

शिवसेनेचे तालुका प्रमुख अशोक भोसले, तालुका उपप्रमुख नागेश वनकळसे तसेच बाळासाहेब वाघमोडे, विद्यार्थी सेना जिल्हा प्रमुख हर्षल देशमुख, अभिजित भोसले, गणेश लाखदिवे, प्रितम सुतार यांनी घोषणा देत ठिय्या दिला.

नागेश वनकळसे म्हणाले, राज्यातील अन्य जिल्ह्यांमध्ये तेथील कारखाने शेतकऱ्यांना लगेच त्यांच्या उसाची किंमत देतात. सोलापूर जिल्ह्यात मात्र नेहमीच उशीर केला जातो. शेतकऱ्यांना नाडले जाते. त्यांच्यावर दर जाहीर करण्याचे बंधन घातले जावे.

कारखान्यांनी महसुली उत्पन्नाच्या ७० टक्के रक्कम शेतकऱ्यांना द्यावी, ऊस नेल्यानंतर १४ दिवसांत उसाचे बिल द्यावे, जिल्ह्यातील अनेक कारखान्यांनी कामगारांचे वेतन थकविले आहे, ते तत्काळ मिळवून द्यावे, गेल्या दोन वर्षांपासूनची उसाची थकीत बिले शेतकऱ्यांना त्वरीत द्यावीत आणि साखर कारखान्यांचे ऊस वजन काटे हे डिजीटल करावेत, अशा मागण्या असल्याचे वनकळसे यांनी सांगितले.

साखर आयुक्त शेखर गायकवाड यांची भेट घेऊन आंदोलकांनी त्यांना मागण्यांचे निवेदन दिले. सर्व संबधितांबरोबर चर्चा करून यावर निर्णय घेण्याचे आश्वासन आयुक्तांनी आंदोलकांना दिले.

Web Title: Sit-in agitation at Solapur Shiv Sena's Sugar Commissionerate for FRP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.