"दोन गाड्यांच्या रेसनंतर अपघात झाला अन्..."; पुणे प्रकरणात नाना पटोलेंचा धक्कादायक आरोप

By ऑनलाइन लोकमत | Published: May 29, 2024 06:19 PM2024-05-29T18:19:57+5:302024-05-29T18:20:24+5:30

Pune Accident : पुणे अपघात प्रकरणावरुन काँग्रेस नेते नाना पटोले यांनी धक्कादायक आरोप केले आहेत.

SIT investigation in Pune accident case misleading says Nana Patole | "दोन गाड्यांच्या रेसनंतर अपघात झाला अन्..."; पुणे प्रकरणात नाना पटोलेंचा धक्कादायक आरोप

"दोन गाड्यांच्या रेसनंतर अपघात झाला अन्..."; पुणे प्रकरणात नाना पटोलेंचा धक्कादायक आरोप

Pune Porsche Accident : पुणेअपघात प्रकरणानंतर सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करताना दिसत आहेत. पुण्याच्या कल्याणीनगर भागात बांधकाम व्यावसायिक विशाल अगरवालच्या अल्पवयीन मुलाने भरधाव वेगात कार चालवून दोघांना चिरडलं. या अपघात दोघांचा जागीच मृत्यू झाला. पोलिसांनी याप्रकरणात अल्पवयीन मुलगा, त्याचे वडील आणि आजोबा यांच्यासह आणखी काही जणांना अटक केली आहे. या प्रकरणात रोज नवे खुलासे होत असल्याने सध्या हा चर्चेचा विषय बनत चालला आहे. दुसरीकडे आता काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी धक्कादायक आरोप केला आहे. या प्रकरणात एका आमदाराच्या मुलाचा समावेश होता असा खळबळजनक आरोप नाना पटोलेंनी मुंबईत बोलताना केलाय.

पुण्याच्या कल्याणीनगर भागात १९ मेच्या पहाटे मद्यधुंद अवस्थेत अल्पवयीन आरोपीने पोर्श कार भरधाव वेगाने चालवत दोघांची हत्या केली होती. यानंतर अल्पवयीन मुलाची बालसुधारगृहात रवनागी करण्यात आली. अल्पवयीन आरोपीला वाचवण्यासाठी अनेक प्रयत्न झाल्याची कबुली पोलिसांनी केली. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी विशेष पथकाची देखील स्थापना करण्यात आली. मात्र आता नाना पटोले यांनी गंभीर आरोप केला आहे. अपघाताच्या वेळी आरोपी आणि आमदाराच्या मुलामध्ये गाडीची रेस लागली होती आणि त्यातून ही घटना घडली असे नाना पटोले यांनी म्हटलं आहे. त्यामुळे आता याप्रकरणात नाना पटोलेंनी केलेल्या दाव्याबाबत काय खुलासा होतो हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

पुणे अपघात प्रकरणी एसआयटी चौकशी दिशाभूल करणारी - नाना पटोले

"पुणे पोर्शे कार अपघात प्रकरणी राज्य सरकार लपवालपवी करून बगलबच्च्यांना वाचवण्याचा प्रयत्न करत आहे. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या एसआयटी समितीच्या डॉ. पल्लवी सापळे यांच्यावरच भ्रष्टाचाराचे अनेक आरोप आहेत. त्यांच्याकडे भाड्याची गाडी आहे. त्याचे महिन्याचे भाडे लाखात आहे. डॉ. सापळे या मिरज हॉस्पिटलमध्ये असताना त्यांनी केलेले कारनामे सर्वांना माहित आहेत. असा भ्रष्ट अधिकारी निष्पक्ष तपास कसा काय करु शकतो? या प्रकरणातील डॉक्टर, पोलीस व राजकीय नेत्यांना वाचण्याचा प्रयत्न केला जात आहे म्हणून सीबीआय चौकशी केली पाहिजे अशी काँग्रेसची मागणी आहे," असे नाना पटोले यांनी म्हटलं. 

"पुणे अपघात प्रकरणी कोणत्या मंत्र्याने फोन केले, त्या गाडीत कोण कोण होते, त्यांची नावे का पुढे येत नाहीत? सरकार लपवालपवी कशासाठी करत आहे? ज्या पबमधून ही मुले निघाली त्यावेळी दोन गाड्या होत्या, त्यांनी गाड्यांची रेस लावली होती व त्यातूनच हा अपघात झाला व दोघांना चिरडले. ससून हॉस्पिटमधील डॉ. तावरे यांनी आरोपीच्या रक्ताचे नमुने बदलले यासाठी डॉ. तावरेंना कोणी फोन होता? गाडी का बदलण्यात आली? त्या पबमध्ये एका आमदाराचा मुलगाही होता, तो कोण? हे राज्य सरकारने स्पष्ट केले पहिजे. डॉ. तावरे यांनीच सर्वांची नावे उघड करेन असे सांगितल्याने त्यांच्या जीवाला धोका होऊ शकतो. त्यामुळे सरकारने डॉ. तावरेंना सुरक्षा दिली पाहिजे. या प्रकरणात डॉ. तावरे महत्वाचा धागा आहेत, तो महत्वाचा पुरावा आहे," असेही नाना पटोले म्हणाले. 

Web Title: SIT investigation in Pune accident case misleading says Nana Patole

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.