पुण्यातील ॲंटिजेन घाेटाळ्याची एसआयटीद्वारे चाैकशी करण्याची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: December 5, 2022 08:59 AM2022-12-05T08:59:55+5:302022-12-05T09:00:26+5:30
ही चाैकशी त्या विभागाने न करता स्वतंत्र यंत्रणेमार्फत करावी, अशी मागणी जाेर धरत आहे...
पुणे : वारजे येथील कै. डाॅ. अरविंद बारटक्के या महापालिकेच्या रुग्णालयात झालेल्या ॲंटिजेन चाचणीतील घाेटाळ्याची चाैकशी त्रयस्थ यंत्रणेद्वारे किंवा स्पेशल इन्व्हेस्टिगेशन टीम अर्थात एसआयटीद्वारे करावी, अशी मागणी आराेग्य क्षेत्रातील कार्यकर्ते, राजकीय संघटना पक्षांनी केली आहे.
या रुग्णालयाला तपासणीसाठी दिलेल्या कीटचा काळाबाजार झाल्याचे वारजे पाेलिसांनी नमूद केले असून, तसे पत्र महापालिकेला दाेन महिन्यांपूर्वीच दिले आहे. यावर अजून कारवाई झालेली नाही. तसेच, आराेग्य विभागाचे विभागप्रमुख डाॅ. आशिष भारती यांनी त्यांच्या स्तरावर चाैकशी सुरू आहे, असे सांगितले आहे. ही चाैकशी त्या विभागाने न करता स्वतंत्र यंत्रणेमार्फत करावी, अशी मागणी जाेर धरत आहे.
सखाेल चाैकशीची गरज :
आपचे प्रवक्ते मुकुंद किर्दत म्हणाले की, या प्रकरणाची चाैकशी ही त्रयस्थ यंत्रणेमार्फत करावी. आराेग्य विभागच चाैकशी करत असेल तर ती निष्पक्षपणे हाेणार नाही. चाैकशीसाठी वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञ असावा असे काही नाही. वारजे पाेलिसांनी प्राथमिक चाैकशी केली असून त्याद्वारे घाेटाळा झाल्याचा निष्कर्ष काढला आहे. यामध्ये अजून चाैकशी करण्यास सांगितले आहे. त्यामुळे या प्रकरणाची ऑडिटरतर्फे आणखी सखाेल चाैकशी हाेणे गरजेचे आहे.
ॲंटिजेन चाचणी घाेटाळा प्रकरणाची चाैकशी ‘एसआयटी’मार्फत व्हायला हवी. कारण महापालिकेने याआधी उघडकीस आलेल्या प्रकरणातही चाैकशी केली नाही. केली तरी कारवाई न करता दाेषींचा बचाव केला आहे. या भ्रष्टाचाराची चाैकशी हाेऊन गुन्हे दाखल व्हायला हवेत. आयुक्तांचा कारभार अंधाधुंद असून त्यांची बदली व्हायला हवी.
- डाॅ. अभिजित माेरे, आराेग्य क्षेत्रातील कार्यकर्ते