देशात रोजगाराची परिस्थिती भयानक : नरसय्या आडम : पुण्यात 'साहित्य संस्कृती संमेलन'
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2018 12:51 PM2018-02-26T12:51:30+5:302018-02-26T12:51:30+5:30
देशात शिक्षण आणि रोजगाराची परिस्थिती भयानक होत चालली आहे, अशी खंत मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीचे सरचिटणीस नरसय्या आडम यांनी व्यक्त केली. साहित्य संस्कृती संमेलनाच्या उद्घाटन समारंभात ते बोलत होते.
पुणे : भारतात बावीस कोटी विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. त्यापैकी सत्तर लाख विद्यार्थी उच्च शिक्षण घेतात व इतर फक्त दहावी, बारावीपर्यंतच शिकतात त्यामुळे साक्षरतेचे प्रमाण कमी होऊन पुढे रोजगाराची संधी उपलब्ध होत नाही. म्हणूनच देशात शिक्षण आणि रोजगाराची परिस्थिती भयानक होत चालली आहे, अशी खंत मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीचे सरचिटणीस नरसय्या आडम यांनी व्यक्त केली.
दलित युवक आयोजित पहिल्या सत्यशोधक मुक्ता साळवे साहित्य संस्कृती संमेलनाच्या उद्घाटन समारंभात ते बोलत होते. आडम यांच्या हस्ते संमेलनाचे उद्घाटन करण्यात आले. या वेळी संमेलन अध्यक्ष लोककलावंत सरुबाई वाघमारे, पुणे मनपा कामगार युनियन अध्यक्ष मुक्ता मनोहर, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते रमेश राक्षे, दलित युवक आंदोलन अध्यक्ष सचिन बगाडे, ज्येष्ठ कार्यकर्त्या कलावती तुपसुंदर, भारिप सरचिटणीस वसंत साळवे, नगरसेवक सुभाष जगताप, मार्गदर्शक अंकत सोनवणे, भाऊसाहेब सोनवणे, वैशाली थोरात आदी उपस्थित होते.
आडम म्हणाले, १९९५-९६ नंतर जागतिकीकरण आणि खासगीकरण झाले तेव्हा पंतप्रधान मनमोहन सिंग आणि इतर नेत्यांनी शेतकऱ्यांची परिस्थिती सुधारेल असे सांगितले. त्यानंतर चोवीस वर्षांत बारा लाख शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आणि महाराष्ट्र त्यामध्ये सर्वांत पुढे आहे. ही फारच वाईट गोष्ट आहे. मोदी आल्यापासून यामध्ये ४२ टक्क्यांनी वाढ झाली आहे.
मुक्ता मनोहर म्हणाल्या, देशातील विषमता वाढल्यामुळे समाज मागे जातो, यासाठी आर्थिक राजकारण कारणीभूत आहे. आजही तंत्रज्ञान आपण विकसित करू शकलो नाही. हे आपल्यासमोर मोठे आव्हान आहे. बगाडे म्हणाले, ज्योतिबांनी स्रियांना ज्ञानाचा हक्क मिळवून दिला. आणि त्यानंतर लहुजी साळवे यांनी आपली मुलगी मुक्ता साळवे हिला शाळेत प्रवेश घेऊन दिला. मुक्ता साळवे ही शाळेत जाणारी पहिली विद्यार्थिनी ठरली. वयाच्या बाराव्या वर्षांपासून मुक्ता यांनी साहित्य लिहिण्यास सुरुवात केली. त्यांनी साहित्यातून दलितांच्या दु:खाविषयी आणि विषमतावादी गोष्टी समाजासमोर मांडल्या. भारतात साक्षरतेचे प्रमाण कमी असताना शासनाने शाळाबंदीचा निर्णय घेतला. ही फारच धोकादायक बाब आहे. मुक्ता साळवे यांच्या साहित्यातून शिक्षणाबद्दल अनेक उत्तम उदाहरणे मांडली आहेत, तर या संमेलनद्वारे त्या समाजात पोहोचविण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत.