पाण्याचा फुगवटा असल्यामुळे परिस्थिती अजूनही बिकट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2021 04:10 AM2021-07-26T04:10:36+5:302021-07-26T04:10:36+5:30
बारामती : कर्नाटक सरकार आणि महाराष्ट्र सरकार एकमेकांच्या संपर्कात आहेत. तसेच कर्नाटकचे पाटबंधारे मंत्री व महाराष्ट्राचे जलसंपदा मंत्री ...
बारामती : कर्नाटक सरकार आणि महाराष्ट्र सरकार एकमेकांच्या संपर्कात आहेत. तसेच कर्नाटकचे पाटबंधारे मंत्री व महाराष्ट्राचे जलसंपदा मंत्री अधिकारी समन्वय राखून पुर परिस्थिती हाताळत आहेत. सध्या पावसाचा जोर कमी झाला आहे. मात्र, पाण्याचा फुगवटा असल्यामुळे अजूनही परिस्थिती बिकट आहे. या संकटात अडकलेल्या जनतेला राज्यसरकार सर्वतोपरी सहकार्य करणार आहे, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.
बारामती येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रविवारी (दि. २५) कोरोना परिस्थितीचा आढावा घेतला. यानंतर ते माध्यमांशी बोलत होते. पवार म्हणाले, दरडी कोसळून आणि भूस्खलनामुळे दुर्देवाने अनेकांचे यात बळी गेले. परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी सबंधीत जिल्ह्याचे पालकमंत्री व विविध खात्याचे मंत्री पुरग्रस्त भागात फिरत आहेत. मी देखील आज सातारा तर उद्या सांगली आणि कोल्हापूर भागाचा दौरा करणार आहे. या भागातील जनतेसाठी तातडीने शिवभोजन थाळी मोफत सुरू करण्यात आली आहे. धान्यामध्ये तांदुळ, डाळ व अन्न शिजवण्यासाठी रॉकेल तसेच फुड पॅकेट, पाण्याच्या बाटल्या पोहचवण्यात येत आहे. जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी तातडीने निर्णय घेण्याचे आदेश अधिकाऱ्यांना दिले आहेत. आतापर्यंत १ लाख लोकांना सुरक्षित स्थळी हलवले आहे. या भागातील पालकमंत्री, विभागिय आयुक्त, जिल्हाधिकाऱ्यांशी माझी चर्चा झाली आहे. अजुन काही मदत तसेच उपाययोजना करण्यासंदर्भात बैठका होणार आहेत. पाण्याचा फुगवटा कमी करण्यासंदर्भात सध्या उपाययोजना सुरू आहेत. अलमट्टी धरणातून ३ लाख क्युसेकने विसर्ग सुरू आहे. तर नद्यांमधून पाऊने तीन लाख क्युसेक पाणी अलमट्टीमध्ये जात आहे. नौदल, वायुदल तसेच सैन्यदल, एनडीआरएफ, एसटीआरएफ बचाव तुकड्या मदतीसाठी आलेल्या आहेत.
---------------------
रामराजे नाईक-निंबाळकर हे त्यांच्या कामासंदर्भात मला भेटण्यासाठी आले होते. त्यांचे काम झाले ते निघून गेले. या संदर्भात काही बोलण्यासारखे नाही. सध्या आपल्यापुढे वेगळे प्रश्न आहेत. त्याकडे लक्ष देऊ, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रामराजे नाईक-निंबाळकर यांच्यावरील प्रश्नाला उत्तर दिले.
-------------------------------