Pune Crime: खेड तालुक्यातील पैलवान कराळे खून प्रकरणात सहा आरोपींना अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: January 7, 2022 04:06 PM2022-01-07T16:06:58+5:302022-01-07T16:07:07+5:30
तीन ते चार आरोपींनी कराळे यांच्या डोक्यात, तोंडावर, छातीवर व पोटावर सुमारे आठ ते नऊ गोळ्या झाडून त्यांची हत्या केली होती
शेलपिंपळगाव : खेड तालुक्यातील शेलपिंपळगाव येथील पैलवान नागेश कराळे हत्या प्रकरणी चाकण पोलिसांनी सहा आरोपींना अटक केल्याची माहिती क्राईमचे पोलीस निरीक्षक अनिल देवडे यांनी दिली.
शेलपिंपळगाव येथे २३ डिसेंबरला रात्री सव्वानऊच्या सुमारास पै. नागेश कराळे हे आपल्या चारचाकीत बसून गाडी चालू करत होते. इतक्यात पाठीमागे दबा धरून बसलेल्या तीन ते चार आरोपींनी कराळे यांच्या डोक्यात, तोंडावर, छातीवर व पोटावर सुमारे आठ ते नऊ गोळ्या झाडून त्यांची हत्या केली. याप्रकरणी योगेश बाजीराव दौंडकर व अन्य तीन ते चार जणांवर पोलिसांनी गुन्हे दाखल केले होते.
दरम्यान हत्येच्या घटनेनंतर दोन - तीन दिवसांनी शेलपिंपळगाव येथून शिवशांत शिवराम गायकवाड (वय ४३ वर्षे, रा. बौध्दवस्ती, शेलपिंपळगाव, ता. खेड) याला पोलिसांनी ताब्यात घेतले होते. त्यानंतर ३ जानेवारीला सोपान नामदेव दौंडकर (वय ५० वर्षे, रा. तुकाईमाता हाउ. सोसा. दिघी रोड, भोसरी, सिध्देश्वर शाळेसमोर, ता. हवेली, जि. पुणे, मुळ रा. शेलपिंपळगाव) याला अटक केली.
तर योगेश बाजीराव दौंडकर (वय ३८ वर्षे, रा. शेलपिंपळगाव ता.खेड जि.पुणे), लक्ष्मण बाबुराव धोजे (वय ३४ वर्षे, रा. शेलपिंपळगाव, ता. खेड, जि. पुणे), ओंकार भालचंद्र भिंगारे (वय २२ वर्षे, रा. उरावडे, ता. मुळशी, जि. पुणे. सध्या रा. साईनाथनगर, पुजा हॉस्पीटलचे बाजुला, पिंपळे गुरव, सांगवी, पुणे) व फिरोज कचरु सय्यद (वय २४ वर्षे, रा. मु.पो. कासुर्डी, ता. दौंड, जि. पुणे सध्या .रा. अविनाश कारंडे याचे घरी, बोरीपारधी, ता. दौंड, जि. पुणे) या चार आरोपींना गुरुवारी (दि.६) रात्री उशिरा अटक केली आहे.
सदर आरोपींकडून पिंपरी - चिंचवड पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश गुन्ह्याची माहिती घेत आहेत. याप्रकरणी गिरीश बाळासाहेब कराळे यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.