शरद पवारांकडून पुण्यासाठी सहा 'कार्डियाक' रुग्णवाहिका; मृत्यूदर कमी असल्याबाबत समाधान
By ऑनलाइन लोकमत | Published: September 4, 2020 09:12 PM2020-09-04T21:12:19+5:302020-09-04T21:17:20+5:30
कोरोना आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न करण्याच्या राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांना सूचना
पुणे : कोरोनावर नियंत्रण मिळविण्यासाठी उभ्या केलेल्या जम्बो कोविड सेंटरमध्ये केवळ कार्डियाक रुग्णवाहिका न मिळाल्याने पत्रकाराला जीव गमवावा लागला. त्यापार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पुण्यात राष्ट्रवादीच्या प्रमुख लोकप्रतिनिधींची बैठक घेत सविस्तर माहिती घेतली. पुण्यामध्ये अशा प्रकारच्या अवघ्या तीनच रुग्णवाहिका असल्याची माहिती समोर आल्यावर त्यांनी आश्चर्य व्यक्त करीत येत्या तीन दिवसात राष्ट्रवादीच्या ट्रस्टच्या माध्यमातून सहा 'कार्डियाक' रुग्णवाहिका पालिकेला देण्याचा निर्णय घेतला.
बारामती होस्टेल येथे शुक्रवारी झालेल्या बैठकीला राज्यसभेच्या खासदार अॅड. वंदना चव्हाण, शिरूरचे खासदार डॉ. अमोल कोल्हे, शहराध्यक्ष आणि आमदार चेतन तुपे, विरोधी पक्षनेत्या दीपाली धुमाळ, प्रवक्ते अंकुश काकडे, नगरसेवक दत्तात्रय धनकवडे, प्रशांत जगताप उपस्थित होते.
शहरातील कोरोनाचे रुग्ण दिवसागणिक वाढत चालले असून आरोग्य यंत्रणा व्हेंटीलेटरवर असल्याचे चित्र आहे. पुणेकर भितीच्या सावटाखाली आहेत. जम्बो कोविड सेंटर उभे करुनही समस्या संपण्याचे नाव घेत नाहीत. यावेळी शहरातील कोरोना स्थितीचा आढावा घेण्यात आला. कोरोना आटोक्यात आणण्याकरिता काय करायला हवे, रुग्ण का वाढत आहेत या संदर्भात या बैठकीमध्ये पवार यांनी सर्वांची मते जाणून घेतली.
कोरोना आटोक्यात आणण्याकरिता काम करा, नागरिकांची सुरक्षा ही सर्वात प्राधान्याची गोष्ट असल्याचे सांगत पवार यांनी महत्वपूर्ण सूचनाही केल्या. मास्क न लावल्याने राज्यात एक कोटी रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. याचाच अर्थ नागरिक अद्यापही गंभीर नसून जनजागृतीची आवश्यकता असल्याचेही पवार यांनी बैठकीत नमूद केले. बैठकीमध्ये पवार यांनी माजी महापौर दत्तात्रय एकबोटे यांच्या मृत्यूबाबत माहिती घेतली. लवकरच राष्ट्रवादीमार्फत प्रत्येक मतदारसंघात हेल्पलाईन सुरू करण्यात येणार आहे. खाटा कुठे उपलब्ध आहेत, चाचणी कुठे करायची याची सविस्तर माहिती देण्यात येणार आहे.
====
मृत्यूदर कमी असल्याबाबत समाधान
शहरातील मृत्यूदर हा २.४० टक्के असल्याबद्दल पवार यांनी समाधान व्यक्त करीत हा मृत्यूदर आणखी खाली येणे आवश्यक असल्याचे ते म्हणाले. अन्य काही शहरांमध्ये मृत्यूदर साडेतीन टक्क्यांच्यावर असून पुण्यात सातारा, नगर, सोलापूर आदी शहरांमधून उपचारांसाठी येणा-यांचे प्रमाण ४० टक्के आहे.
=====
अत्यवस्थ कोरोना रुग्णांना देण्यात येणारे ‘रेमिडीसिव्हर’ या इंजेक्शनचे १५० नग पवार यांनी शहराध्यक्ष तथा आमदार चेतन तुपे यांच्याकडे सोपविले. हे इंजेक्शन्स ससून आणि जम्बो हॉस्पिटलमध्ये देण्यात येणार आहेत.