पुराच्या पाण्यात वाहून गेलेला ''व्हिक्टर'' सहा दिवसानंतरही बेपत्ता
By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2019 07:00 PM2019-09-30T19:00:04+5:302019-09-30T19:31:29+5:30
डोळ्यात प्राण आणून भावाचा घेत आहे शोध...
पुणे : भैरोबानाल्याला आलेल्या पुरात गंगा सॅटेलाईट भागातून व्हिक्टर सांगळे ही व्यक्ती गाडीसह वाहून गेली आणि त्यासोबत त्याची जिद्द व परिस्थितीवर मात करुन जगण्याची उमेद ही संपली. दोन दिवसानंतर गाडी तर मिळाली पण व्हिक्टरचा तपास सहा दिवस झाले तरी लागलेला नाही. अवघ्या १७ - १८ वयात डाव्या पायाला कॅन्सरसारखा आजार असल्याचे माहित झाल्यावर जराही खचून न जाता पुढे उपचारात पाय काढावा लागला. तरुण पणातच एका पायावर पुढील आयुष्य कसे काढायचे या विचाराने खचून न जाता एमकॉमची पदवी घेत चार्टर्ड अकांउट चे स्वप्न उराशी बाळगून सीए परीक्षा पास होऊन नुकतीच प्रॅक्टीस संपवली होती.
आजारपणात डाव्या पायावर शस्त्रक्रिया करुन कृत्रिम पाय बसवण्यात आला. भाऊ व आई वडिलांच्या साथीने आयुष्यात हार न मानता शिक्षण पूर्ण करत सी. ए. पदवी मिळवली. पाय नसताना देखील व्हिक्टर ला स्विमिंग येत होते हे विशेष.
गाडी मिळाली, पण व्हिक्टर नाही...
गाडीसह वाहून गेलेल्या व्हिक्टरची गाडी शुक्रवारी सकाळी चिमटा वस्ती येथील ओढ्यात मिळाली. त्या गाडीत तो असण्याची अशा यावेळीही मावळली. त्यामुळे गाडी मिळाली असली तरी व्हिक्टर चा शोध लागला नसल्याने त्याचे मित्र, नातेवाईक व लष्करातील जवानांकडून शोधाशोध सुरु आहे.
डोळ्यात प्राण आणून भावाचा घेत आहे शोध...
व्हिक्टरचा भाऊ स्टीफन सांगळे हे भारतीय लष्करात मेजर या पदावर कार्यरत आहेत. पुण्याच्या पावसात भाऊ वाहून गेल्याची माहिती त्यांना कळताच, स्टीफन सांगळे विमानाने तातडीने पुण्यात आले आणि लष्कराच्या मदतीने आपल्या भावाचा शोध सुरू केला आहे. शोधकार्यात सापडलेल्या गाडीचा चेंदामेंदा झाला आहे. डोळ्यात प्राण आणून व्हिक्टरचा भाऊ मेजर स्टीफन त्याचा शोध घेत आहेत.
वाहून जात असताना वाचवण्याची करत होता विनवणी....
हिमालयातील सायकलसवारी संपवून बुधवारी सहा वाजता घरी आल्यानंतर रात्री दहा अकराच्या सुमाराला वानवडीतील मावशीकडे जात असताना गंगा सँटेलाईट येथे पुलावर पाण्यात अडकल्याचा फोन भावाला केला होता तसेच आपण पाण्यात कोठे अडकलो आहोत याचे लोकशन ही पाठवले होते. त्यानंतर त्याचा फोन बंद झाला आणि ते त्याचे शेवटचे संभाषण ठरले.
पाण्यात आपण वाहून जात आहोत समजल्यावर तेथे असलेल्या व्यक्तींना 'मी वाहून जात आहे मला वाचवा, मला वाचवा' अशी विनवणी व्हिक्टर करत होता. रहेजा गार्डन सोसायटीतील नागरिकांनी घराच्या गच्चीवरुन हा थरार पाहिला. घराच्या गच्चीवरुन व्हिक्टरच्या जीवन मरणाचा संघर्ष कॅमेऱ्यात कैद झाला. या अगोदर व्हिक्टरला पाण्यात पुढे जाऊ नका असे तेथील व्यक्तींनी सांगितले असताना देखील तो पुढे पाण्यातून जाऊ लागला. परंतु पाण्याचा अंदाज न आल्याने तो गाडीसह वाहून गेला.